प्रदीप पोतदारकवठेएकंद : एकीकडे यंदाचा द्राक्ष हंगाम संपत आला असतानाच पुढील हंगामाच्या दृष्टीने पुन्हा नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. कवठेएकंद (ता. तासगाव) परिसरातील द्राक्षबागांच्या एप्रिल खरड छाटणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
लहरी हवामान, वाढते खते व औषधांचे दर, मजुरांची कमतरता, रास्तदरांचा अभाव, बोगस कीटकनाशके, दलाल द्राक्ष व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक अशा विविध नैसर्गिक व कृत्रिम संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.
द्राक्ष पिकातून येणारे उत्पन्न व व्यवस्थापन खर्च याचा ताळमेळ बसत नाही. यामुळे द्राक्ष शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे, तर पुन्हा पुढच्या वर्षीचा हंगाम साधेल या आशेने तजबीज करून नव्या जोमाने शेतकरी उभा राहताना दिसतोय.
एप्रिल महिन्यात खरड छाटणीपूर्वी द्राक्षबागेत रासायनिक खते, सेंद्रिय खत व शेणखत अशी खत भरणी केली जात आहे. सेंद्रिय खते निंबोळी पेंड, गांडूळ खत, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
खरड छाटणी आणि खत भरणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक तजबीज करावी लागत आहे. एप्रिल छाटणीसाठी प्रतिझाड तीन ते चार रुपये मजुरी दराप्रमाणे केली जात आहे. प्रति एकर सहा ते सात हजार रुपये मजुरी येत आहे, तर खत भरणीसाठी साधारणतः ४० हजार रुपये खर्च येत आहे.
यंदा द्राक्ष हंगामाने पहिला टप्प्यात दरच नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर पुढील हंगामासाठी द्राक्ष बाग टिकवण्यासाठी आता नव्याने प्रतिएकर ५० ते ६० हजार रुपये खर्च करावा लागत आहे. आशावादी असणाऱ्या द्राक्ष शेतकऱ्यांनी पुन्हा खरड छाटणी घेऊन जोमाने पुढील हंगामासाठी तयारी सुरू केली आहे.
सेंद्रिय व्यवस्थापनावर भररासायनिक खतांचा परिणाम, क्षमता व किमती लक्षात घेता सेंद्रिय खत व शेणखताचा वापर करणे योग्य आहे. जमिनीची सुपीकता आणि द्राक्षवेलींची क्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय खत व जैविक व्यवस्थापनावर भर देत आहे सेंद्रीय खतामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास चांगली मदत होते, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी आप्पासो शिरोटे यांनी सांगितले.