बालाजी आडसूळ
कळंब : दोन दशकांपूर्वी जिथं उजाड माळरान होतं, तिथं 'शुगर केन क्रशिंग उद्योगांच पाऊल पडल्यानंतर आता नंदनवन फुललं आहे. हजारो हातांना काम देणारे एक-दोन नव्हे, तर तब्बल सात ऊस गाळप करणारे कारखाने उभे राहिले. एकूणच देशाच्या साखर अन् गूळ उद्योगात कळंब तालुक्याने मानाचे स्थान निर्माण केले आहे.
कळंब, आकांक्षित धाराशिव जिल्ह्यातील एक तालुका. मांजरा, तेरणा, वाशिरा अशा हंगामी वाहणाऱ्या नद्यांचा समावेश असलेला बालाघाट रेंजचा एक भूभाग, इथलं लोकजीवन शेतीवर अन् शेती निसर्गावर निर्भर, कायम बेभरवशाची. कधी ओला तर अनेकदा कोरडा दुष्काळ राशीला मांडून ठेवलेलाच असतो.
यामुळेच इथल्या पिढ्या दर पिढ्या रोजगार अन् उदरनिर्वाहासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या शहरात स्थलांतरित झालेल्या. उद्योग नावालाच, व्यवसायही जेमतेमच. अशा या तालुक्यात मागच्या अडीच दशकांत ऊस गाळप करणाऱ्या साखर व गूळ निर्मिती उद्योगांनी मोठी क्रांती करून अर्थकारणाला मोठा हातभार लावला आहे.
सद्यःस्थितीत तालुक्यात एकूण सात साखर कारखाने आहेत. यात सर्वप्रथम कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी साल २००० मध्ये रांजणी येथे नॅचरल शुगर सुरू केला. यानंतर हावरगाव येथे शंभू महादेव (सध्याचा डीडीएन), चोराखळी येथील धाराशिव साखर (पंढरपूर येथील डीव्हीपी उद्योग समूह) सुरू झाला.
दरम्यान, वाठवडा येथे डीडीएन, मोहा येथे मोहेकर अॅग्रो, खामसवाडीत सिद्धिविनायक हे गूळ पावडर कारखाने उभा राहिले. याशिवाय सुधीर पाटील यांच्या मंगरूळ शिवारातील सातवा कारखाना गाळपाच्या तयारीत आहे.
साखरेचा गोडवा, देशपातळीवर ठसा...
रांजणीचा नॅचरल शुगर देशपातळीवरच्या साखर उद्योगाची पंढरी ठरला आहे. देशभरातील साखर उद्योगातील धुरीण नॅचरलची कार्यशीलता, आर्थिक शिस्त अनुभवण्यासाठी रांजणी गाठतात. पंढरपूरच्या डीव्हीपी उद्योग समूहाने धाराशिव कारखाना उत्तमरीत्या चालविलाच, शिवाय ज्यावेळी कोरोनात श्वास रोखला गेला, त्यावेळी देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभारून घाबरलेल्या समाजमनात श्वास फुलविण्याचे काम केले. सिद्धिविनायक परिवाराने पण सुखद चित्र निर्माण केले आहे. नॅचरलच्या फेरो मॅग्निज स्टील, बायोसीएनजी, दुग्ध, तसेच इतर पूरक प्रकल्पांचे कायम कौतुक होत आले आहे.
हजारोंना दिला रोजगार...
तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल परिवाराने तब्बल दोन हजारांहून अधिक लोकांना थेट रोजगार दिला आहे. यात तालुक्यातील दीड हजारांवर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी दिलेला अप्रत्यक्ष रोजगार, तर अनगिनत आहे. धाराशिव व डीडीएन शुगरनेही प्रत्येकी तीनशेपेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला आहे. तिन्ही गूळ पावडर कारखान्यातही प्रत्येकी १७५ ते २०० व्यक्तींना कामगार, कर्मचारी म्हणून रोजगार प्राप्त झाला आहे.
उजाड माळरानावर उद्योगाचे नंदनवन
रांजणीचा नॅचरल, हावरगावचा डीडीएन, चोराखळीचा धाराशिव शुगर, मोह्याचे मोहेकर अॅग्रो, वाठवड्याचा डीडीएन असे आज कार्यान्वित झालेल्या बहुतांश प्रकल्पाच्या जागी पूर्वी उजाड माळरान होते. आज तेथे कल्पकता, जिद्द अन् कष्टाच्या बळावर उद्योगाचे नंदनवन फुलले आहे. पूरक व्यवसाय बळावले आहेत. जिथं प्यायला पाणी नव्हते, तिथे आज वृक्षराजी बहरली आहे. अनेकांचे स्वप्न खुलले आहे.
दररोजची विक्रमी गाळप क्षमता...
जिल्हा हा साखर आयुक्तांच्या सोलापूर सहसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत येतो. या विभागातच नव्हे, तर कळंब तालुक्याने मराठवाड्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. जिल्ह्याच्या तुलनेत एकूण गाळप, साखर उत्पादन यामध्ये एकट्या कळंबचा वाटा २५ टक्क्यांहून अधिक आहे. दररोज २० हजार मेट्रिक टन एवढ्या विक्रमी ऊस गाळपाची तालुक्यात क्षमता स्थापित झाली आहे. एकूणच एकाच तालुक्यात तीन साखर व चार गूळ पावडर कारखाने असलेला कळंब हा एकमेव तालुका ठरतोय. यामुळेच या क्षेत्रात आता कळंबचे नाव मोठ्या अदबीने घेतले जात आहे.
हेही वाचा : Success Story : नोकरीचा नाद सोडला अन् शेतीची कास धरली; मनोजची यशस्वी आधुनिक शेती