मंगेश व्यवहारेनागपूर : सायंकाळी पाच वाजताच सगळे भीतीने (Fear) आपापल्या घरात असतात. या गावातील (village) कुणीच बाहेर पडत नाही. दिवसाही कुणी एकटा निघत नाही. शेतीची कामे ठप्प आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट कमी झाली.
एका व्यक्तीसह डझनभर जनावरांचा बळी त्या वाघाने (Tiger) घेतला आहे. हा वाघ दररोज कुठल्यातरी गावात, शिवारात (Farm), शेतात गावकऱ्यांच्या दृष्टीस पडतोच. गावगाडाच ठप्प पडल्याने वाघाच्या बंदोबस्तासाठी वन विभाग पावले उचलणार, असा प्रश्न पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बनेरा व कोलितमारा गेटच्या मार्गावर वसलेल्या गावांमधील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून इथे या वाघाची दहशत आहे. पारशिवनी तालुक्यातील आमगाव, परसोडी, बाबूळवाडा, बुलेवाडी, बिटोली, पालासावळी, कोंडासावळी, आवळेघाट, खैरी, सालई, चारगाव या गावांमधील घरोघरी सध्या वाघांचीच चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच आमगाव येथील सहादेव सूर्यवंशी हे वाघाच्या हल्ल्यात मृत झाले. दोन महिन्यांपूर्वी परसोडीतील चंदू इंगळे यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
आमगावातील अंजू संजय शिवणकर या शेतात फन वेचण्यासाठी गेल्या असता, वाघाने डरकाळी फोडली त्यांनी घाबरुन पळत असताना पडल्याने पाय आणि हाताला गंभीर जखम झाली. प्रभा वामन बुरडे या शेतात काम करीत असताना, त्यांच्यावर वाघाने झडप मारली, त्या थोडक्यात वाचल्या. मात्र, अजूनही त्या दहशतीत आहेत. अनेक गावकऱ्यांची जनावरे वाघांची शिकार केलेली आहे.
कामे थांबली त्याचे काय?
वाघाच्या दहशतीमुळे शेतातील कामे थांबली आहेत. महिला मजुरीला यायला तयार नाहीत. जनावरांची चराई बंद झाली आहे. पुरुष मंडळी समूहाने गावात फिरत आहेत. शेताच्या रस्त्यांवर दुपारची भटकंती बंद झाली आहे. आमगाव, परसोडी, बाबुळवाडा येथील गावगाड्यातील कामे थांबली आहेत.
आमच्या गावांमध्ये दोन वाघ आहेत, जे प्रचंड दहशत माजवित आहेत. त्याच्या हल्ल्यात एकाचा बळी गेल्याने व काही जण जखमी झाल्याने ग्रामस्थ दहशतीत आहेत. बंदोबस्तासाठी वन विभागाला पत्रव्यवहार केला आहे. वाघ कुणाचा बळी घेईल सांगता येत नाही. ग्रामपंचायतला लागून असलेल्या शेतात वाघ गावकऱ्यांनी बघितला आहे. - रंजना रेवतकर, सरपंच, गटग्रामपंचायत
पेंच रोडवर दोन मोठ्या शाळा आहेत. या शाळांमध्ये परिसरातील गावातून विद्यार्थी येतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाघ दिसला आहे. शनिवारी सकाळची शाळा असल्याने विद्यार्थ्यांचा पट कमी झाला आहे. शाळेतील शिक्षकही शाळा सुटल्यावर विद्यार्थी सुखरूप घरी पोहोचेपर्यंत शाळेतच असतो. वाघांच्या दहशतीमुळे पालकांसोबतच विद्यार्थी पाठवावे किंवा शाळेच्या बसने विद्यार्थी यावे, असे पालकांना सुचविले आहे. आता परीक्षांचे दिवस आहेत. त्यामुळे काळजी आणखी वाढली आहे. - नारायण बावनकुळे, पर्यवेक्षक, लाल बहादूर शास्त्री विद्यालय