Join us

सोयाबीनवरील येलो मोझॅकसाठी पांढऱ्या माशीचे वेळीच व्यवस्थापन करा

By बिभिषण बागल | Published: September 07, 2023 11:38 AM

सोयाबीन पीक फुलोरा, तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. या पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही माशी रस शोषण करणाऱ्या गटातील कीड आहे. ही माशी 'यलो मोझॅक' रोगाचा प्रसार करते.

सोयाबीन पीक फुलोरा, तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. या पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही माशी रस शोषण करणाऱ्या गटातील कीड आहे. ही माशी 'यलो मोझॅक' रोगाचा प्रसार करते. काही ठिकाणी यलो मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी पीकवाढीच्या अवस्थेपासून पिकाचे निरीक्षण करून किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

पांढरी माशीची ओळखप्रौढ माशी १ ते २ मी.मी. आकाराची, फिक्कट हिरव्या रंगाची राहते. तिच्या पंखांवर पंधरा मेनचट पातळ थर असतो.

प्रादुर्भावग्रस्त झाडांचा काही भाग पडतो पिवळसरपांढरी प्रौढ माशी व तिचे पिल्ले पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त झाडाचा काही भाग हिरवट, तर काही भाग पिवळसर होतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. परिणामी झाडाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून गळतात.

शेतकऱ्यांनी काय करावे?- यलो मोझॅकचे एकात्मिक व्यवस्थापन करताना दक्ष राहणे गरजेचे आहे.- यलो मोझॅकचा प्रादुर्भाव दिसताच प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून काढणे गरजेचे आहे.- पिवळे चिकट सापळे १५ बाय ३० से.मी. आकाराचे किवा तत्सम आकाराचे ६४ प्रति एकर पिकाच्या समकक्ष उंचीवर लावावेत.- पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.- उन्हाळी सोयाबीन पीक घेणे शक्यतो टाळावे.

सिन्थेटिक पायरेथ्रोइड कीटकनाशकाच्या जादा फवारण्या शेतकऱ्यांनी टाळाव्या- बीटासायफ्लूथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के ७ मिलि किंवा थायोमेथोक्झम १२.६ टक्के अधिक लॅमडा सायहलोथ्रीन ९.५ टक्के २.५ मिलि किंवा क्लोरांट्रानिलीप्रोल ९.३० टक्के अधिक लॅमडा सायह- लोथ्रीन ४.६० टक्के ४ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.- संबंधित कीटकनाशके शिफारशीत किंवा लेबल क्लेम नाहीत; परंतु आंतर- प्रवाही असल्यामुळे पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन होईल. सिन्थेटिक पायरेथ्रोइड कीटकनाशकाच्या एक किंवा दोन फवारण्या कराव्यात. जास्त फवारणी केल्यास पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे कृषीतज्ज्ञां- कडून सांगण्यात आले.

प्रादुर्भाव अधिक झाल्यास उत्पादनात येते घटप्रादुर्भाव अधिक झाल्यास फुले व शेंगा गळतात. पानांमधील हरितद्रव्य नाहीसे झाल्याने अन्ननिर्मितीमध्ये बाधा निर्माण होऊन उत्पादनामध्ये लक्षणीय घट येते. यलो मोझक रोग मुंगबीन येलो मोझॅक विषाणू व मुंगबीन येलो इंडिया विषाणू या प्रजातीमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव पसरविण्यासाठी पांढरी माशी वाहक ठरते. उष्ण तापमान व दमट वातावरण, दोन पावसामधील खंड व प्रखर सूर्यप्रकाश रोगाच्या वाढीस पोषक आहे.

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणपीकशेतकरीखरीपपाऊस