पिंपरी : चिंचवड येथील शंकर पाटील यांनी घराच्या छतावर फुले, फळे व भाजीपाल्याची बाग फुलवली आहे. स्वयंपाकघरातील शिळे अन्न, भाज्यांच्या काड्या व पाला- पाचोळ्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करत त्यांनी रसायनमुक्त फळे व भाजीपाला टेरेसवरच पिकवला आहे. यासाठी त्यांना खत व्यवस्थापन आणि कीटक नियंत्रण अशा अडचणींचा सामना करावा लागला.
शंकर पाटील यांनी घराच्या छतावर मोसंबी, अंजीर, पेरू, सीताफळ, डाळिंब, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, अननस, चिकू, पपई या फळांच्या रोपांसह वांगी, गवार, भेंडी आणि फुलझाडांची लागवड केली. गावाकडे शेती असल्याने माहिती होतीच, मात्र नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत कमी जागेत बाग फुलवली. मोठ्या कुंड्यांचा वापर न करता खोल आणि कमी जागेत बसणाऱ्या कुंड्यांचा वापर केला.
यामुळे झाडांची मुळे खोल जाण्यास मदत होऊन झाडे बहरली. कीटक नियंत्रणासाठी नैसर्गिक पद्धत वापरली. बहुतांशवेळा कुंडीमधील मातीला वारंवार पाणी घातल्याने सुपीकता जाते. मात्र, पाटील यांनी जैविक खतांचा वापर करून मातीची सुपीकता टिकवली. या कामात पत्नी व मुलेही त्यांना मदत करतात.
पाटील यांनी घेतलेल्या मेहनतीचें फळ हळूहळू मिळू लागले असून त्यांची टेरेसबाग विविध रंगीबेरंगी फुलांनी व रसाळ, फळांनी बहरली आहे. त्यांना आता रोजचा भाजीपाला टेरेस बागेतूनच मिळतो.
बाग कशी बनवली?
शंकर पाटील यांचे चिंचवड येथे घर आहे. टेरेसवर कुंड्यांमध्ये मातीचा थर टाकून बाग बनवली. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी व्यवस्था केली. रोपांना नियमितपणे पाणी आणि खत दिले.
टेरेस बागेचे फायदे
टेरेस बागेमुळे ताजी आणि स्वच्छ फळे व भाजीपाला मिळतो. बागेमुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंददायी बनते. उन्हाळ्यामध्ये तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
शहरी भागात राहणाऱ्या लोकांसाठी टेरेस बाग उत्तम पर्याय आहे. यामुळे ताजी आणि स्वच्छ फळे, भाजीपाला मिळतो. वातावरण चांगले राहते. रसायनयुक्त फळे व भाजीपाल्यापासून दूर राहता येते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
- शंकर पाटील, चिंचवड