Join us

पिकांच्या रक्षणासाठी शेतशिवारात लावली झटका मशीन, वन्य प्राण्यांना बसतोय आळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 1:00 PM

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी झाटका मशीन कामी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वन विभागाला वारंवार सांगूनही वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेताला तार कुंपण करून सौर ऊर्जेवर झटका मशीन तयार केली. या मशीनमुळे वन्यप्राण्यांना शेतात येण्यास आळा बसेल व पिके नुकसानीपासून वाचतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.वसमत तालुक्यातील शेतशिवारात मागच्या काही महिन्यांपासून नीलगाय, वानर, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांनी वन विभागाला सांगितले; परंतु रबी हंगामात संपत आला तरी वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त केला नाही. सद्य:स्थितीत शेतशिवारात केळी, ऊस, ज्वारी, करडई, भाजीपाला आदी पिके उभी आहेत. पिकांचे वन्यप्राण्यांना नुकसान करता येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचे अवलोकन करत पिकांच्या रक्षणासाठी सौर ऊर्जेवरील झटका मशीनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.वन्यप्राणी पिकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागल्यास त्यांना हलकासा धक्का लागेल व प्राणी परत जातील, असे शेतकरी सांगत आहेत. वसमत तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी 'झटका मशीन' बसवून पिकांचे संरक्षण करणे सुरू केले आहे. सौर ऊर्जेवरील १२ ते २४ व्होल्टेजची झटका मशीन बाजारात उपलब्ध झाली आहे. पिकांच्या चोहोबाजूंनी लाकडे रोवून त्यावर बारीक तारेने कुंपण केले जात आहे. वन्यप्राण्यांनी पिकांत जाण्याचा प्रयत्न केला तर हलकासा धक्का लागेल, अशी ही मशीन आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

सौर ऊर्जेवरील झटका मशीन उपयोगी

सध्या शेतात केळी, भुईमूग, ऊस आदी पिके आहेत. वन्यप्राणी या पिकांची नासाडी करत आहेत. वनविभागास अनेक वेळा सांगितले; परंतु अजूनही वन विभागाने लक्ष दिले नाही. सौर ऊर्जेवरील झटका मशीन शेतात बसविली असून वन्यप्राण्यांचा त्रास कमी झाला आहे.- भास्कर साळुंके, शेतकरी

झटका मशीनसाठी वीजपुरवठ्याची गरज नाही. कोणतीही जीवितहानी होणार नाही, अशी ही झटका मशीन आहे. यामुळे पिकांचे रक्षण होत आहे.-बालाजी दळवी, शेतकरी

टॅग्स :शेतीतंत्रज्ञान