पी. एम. किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक अनुदान देण्यात येते. सध्या चांदूर बाजार तालुक्यात २९ हजार ५०० शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अद्यापही पाच हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने लाभापासून वंचित आहेत. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांनी ६ सप्टेंबरपर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले होते.
योजनेनुसार शेतकऱ्यांना ई-केवायसी, बँक खात्याशी आधार संलग्न करणे तसेच भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे याबाबी योजनेचा लाभ मिळण्यासाठी बंधनकारक आहे. कृषी सहायकांमार्फत वारंवार सूचना देऊनही यासाठी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
७ सप्टेंबरपासून कोणत्याही क्षणी पी.एम. किसानच्या ई-केवायसी व इतर अटी पूर्ण न करणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची नावे योजनेतून वगळण्यात येतील, असे एका पत्रकाद्वारे तालुका कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
पी.एम. किसानच्या अटींची पूर्तता करण्यासाठी कृषी विभागाने चार महिने मोहीम राबवली होती. तालुक्यातील पाच हजार शेतकरी लाभापासून वंचित आहेत. ७ सप्टेंबरनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नावे योजनेतून कमी करण्यात येतील. याबाबतच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. - शिवाजी दांडेगावकर, तालुका कृषी अधिकारी, चांदूर बाजार