वसमत येथील टोकाई सहकारी साखर कारखाना परभणी जिल्ह्यातील एका कारखान्यास सहयोग तत्त्वावर चालविण्यास देण्यात येणार होता. करारासंबंधी मोठी उठाठेवही झाली. परंतु, कारखान्याची अधिमंडळाची विशेष सभा न होताही गाजली.
मध्यंतरी सहयोग तत्त्वाचा करार झाल्याचा नुसता आव आणण्यात येत होता. मात्र, अद्यापही कराराची माहिती संचालकांना नाही. मग, टोकाईचा करभार परभणी येथून कसा काय चालतो ? असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह संचालकांतून उपस्थित होत आहे.
वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना डबघाईस आला असून, सन २०२३ - २४ चे गाळप हंगाम नियोजनाआभावी व्यवस्थित झाले नाही. शेतकऱ्यांची नऊ कोटी रुपयांची एफआरपीही मिळाली नाही.
कारखाना टिकावा हा हेतू बाळगून संचालक मंडळांनी वारंवार प्रयत्न केले. गेल्या अकरा महिन्यांपासून संचालकांची बैठकदेखील कारखाना अध्यक्षांनी घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. परभणी जिल्ह्यातील एका कारखान्यास टोकाई चालविण्यासाठी देण्याचे प्रयत्न सुरू होते.
त्यासाठी सहयोग तत्त्वाच्या करारासाठी घेण्यात आलेल्या अधिमंडळाची विशेष सभा पूर्ण होण्याआधीच अध्यक्ष जाधव यांनी काढता पाय घेताच सभेचा गाशा गुंडाळला होता.
तरीपण टोकाई कारखान्याचा सहयोग तत्त्वाचा करार होणार यासाठी मोठे प्रयत्न झाले. परंतु, अद्यापही टोकाई सहयोग तत्त्वाचा करार झाला नसल्याची माहिती आहे, असे असतानादेखील टोकाईचा कारभार परभणी येथून चालत आहे.
एका कार्यालयात जमावे, असा उल्लेख होता. आठवड्यापूर्वी टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या नोटीस बोर्डावर एक नोटीस लावण्यात आली होती. त्यात सर्व कर्मचाऱ्यांनी परभणी येथील हा सर्व प्रकार काय याची साधी कल्पनादेखील संचालक मंडळांना माहीत नसल्याची माहिती आहे.
करार नसताना कारखान्याचा कारभार परजिल्ह्यातून कसा ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, या भागातील शेतकरी आता कारखान्यास ऊस देताना विचार करणार, हे पण तेवढेच सत्य आहे.
सहयोग तत्त्वाच्या कराराची स्पष्टता नाही
कारखाना संचालकांची गेल्या ११ महिन्यांपासून बैठक घेण्यात आली नाही. कारखान्याचा करार झाला किंवा नाही, याची माहिती साखर संचालक नांदेड यांच्याकडे मागितली आहे. परंतु, अजूनही त्या संदर्भात माहिती मिळाली नाही. तसेच सहयोग तत्त्वाच्या कराराची स्पष्टता नाही. - खोब्राजी नरवाडे, संचालक
गाळपासाठी ऊस कसा मिळणार ?
टोकाई सहकारी साखर कारखान्याचा सहयोग तत्त्वाचा करार झाला नाही. असे असताना परभणी येथून कारखान्याचे सूत्र हालत आहेत. हा प्रकार काय याचाही ऊस उत्पादक शेतकरी विचार करीत आहेत. भविष्यात कारखान्यास ऊस द्यावा की नाही ? याचा पण आता विचार या भागातील शेतकरी करू लागले आहेत.