Join us

बाजारभावाच्या आकर्षणामुळे दिंडोरी तालुक्यात टोमॅटो लागवडीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 3:38 PM

बाजारभाव असेच टिकून राहतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून टोमॅटो पिकाचे आकर्षण सर्वांनाच भुरळ घालताना दिसत आहे.

द्राक्ष पंढरीच्या दिंडोरी तालुक्यात द्राक्षाच्या खालोखाल नगदी पीक संबोधले जाणाऱ्या टोमॅटोची लागवड वेगाने चालू झाल्याचे चित्र तालुक्याच्या पश्चिम भागात गावोगावी पाहावयास मिळत आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर छाटणीच्या द्राक्ष पिकापासून तर उन्हाळ कांद्याची विक्रमी लागवड आणि त्यापाठोपाठ उन्हाळी टोमॅटोचे दर्जेदार उत्पादन या संपूर्ण क्रमवार उत्पादनातून शेतकऱ्याला द्राक्ष पंधरा ते वीस रुपये कांदा चारशे ते सातशे आठशे रुपये तर टोमॅटो फक्त चाळीस ते सत्तर ऐंशी रुपये विकावा लागला. त्यामुळे खर्च सुद्धा निघणे जिकिरीचे झाले होते.

परंतु जून महिन्याच्या अखेरपर्यंत टोमॅटोचे भाव मात्र अचानक गगनाला भिडले. त्यामध्ये अगदी बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांना लॉटरी लागल्याप्रमाणे चांगले भाव मिळत आहे. त्यामुळे यापुढेही बाजारभाव असेच टिकून राहतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून टोमॅटो पिकाचे आकर्षण सर्वांनाच भुरळ घालताना दिसत आहे.

रोपवाटिकेतही शेतकरी टोमॅटोच्या रोपांसाठी गर्दी करतांना दिसून येत आहेत. त्यामध्ये आर्यमान, योगी ३५, २१७४, २२५, २३८३, अशा जातीच्या मालाला टिकावू आणि परराज्यात पसंतीस उतरत असलेल्या रोपास जास्त पसंती वणी, दुधखेड, पारेगाव, मुळाणे, भातोडे, चंडीकापूर, अहिवंतवाडी, मांदाणे, चामदरी, कोल्हेर, पिंप्री अंचला, पांडाणे, अंबानेर, सागपाडा, पुणेगाव, कोशिंबे, माळेदुमाला, हस्ते, चौसाळे, पिंगळवाडी, करंजखेड, कोशिंबे या परिसरातील शेतकरी देत आहेत. फक्त जुलै महिन्यातच पंधरा ते वीस लाख रोपे प्रत्येकी रोप वाटिकेतून विकली गेल्याचे तालुक्यातील रोपवाटिका मालक सांगत आहेत.

टॅग्स :खरीपशेतकरीलागवड, मशागत