Join us

टोमॅटो कृपा... दीड महिन्यातच ४० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2023 10:31 AM

नगर जिल्ह्यातील भातोडीतील शेतकऱ्याची दहा वर्षांपासून टोमॅटोवर निष्ठा

अहमदनगर जिल्ह्यातील भातोडी येथील शेतकऱ्याला अवघ्या दीड महिन्यात टोमॅटोने ४० लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. गेल्या दहा वर्षांपासून भाव मिळो अथवा न मिळो निष्ठेने ते कुटुंबीय टोमॅटोची शेती फुलवितात. यंदा त्यांच्या कष्टाचे चीज झाले. त्यांना किलोला सरासरी ८० ते १०० रुपये भाव मिळाला.

विशेष म्हणजे टोमॅटोसाठी लागवड, खत, औषध फवारणी, तारेचे कुंपण असा एकूण दोन ते अडीच लाखांचा खर्च आल्याचे त्यांनी सांगितले.

दहा वर्षापासून आम्ही टोमॅटोची लागवड करतो. दराची चिंता न करता टोमॅटोच्या शेतीत प्रामाणिक काबाडकष्ट करीत राहिलो. यंदा उच्चांकी भाव मिळाला. - बबन धलपे, शेतकरी, भातोडी, ता. नगर

एक रुपया किलो भावानेही विकले

  • भातोडी येथील बबन धलपे या शेतकऱ्याकडे ८ एकर शेती आहे. त्यापैकी दीड एकरावर त्यांनी एप्रिलमध्ये टोमॅटोची लागवड केली. उन्हाळ्यात टोमॅटोचे दर एक रुपया किलोपर्यंत घसरले होते. 
  • धलपे यांना जुलैपासून टोमॅटो मिळण्यास सुरुवात झाली तेव्हा ८० रुपये भाव मिळाला. शंभर रुपये भाव मिळू लागला. त्यानंतर भावाने उसळी मारून शंभरी पार केली. 
  •  मुंबई-पुण्यात तर हे दर दोनशेच्या घरात गेले होते. दीड महिन्यातच त्यांना जवळपास ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीक व्यवस्थापनपीकशेतीअहमदनगर