पावसाने पाठ फिरवल्याने या वर्षी शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा पार सुपडा साफ झाला. तरीही काळजावर दगड ठेवून काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुइमूग, ज्वारी, गहू, भाजीपाल्यासह फळभाज्यांची लागवड केली, परंतु बाजारपेठेत पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या जणू जिव्हारी घाव लागत असल्याचे चित्र आहे. सध्या बाजारातटोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने हाडोळती येथील आयुब शेख या शेतकऱ्यावर अक्षरशः टोमॅटो जनावरांपुढे टाकण्याची वेळ ओढवली आहे.
हडोळती येथील आयुब शेख यांनी चाकूर तालुक्यातील वडवळ येथील नर्सरीतून टोमॅटोची रोपे विकत आणून तीन एकर क्षेत्रात लागवड केली. मशागत, नांगरटी, रुटर, शेणखत टाकणे, बेड तयार करणे, खते व औषधांचा डोस देणे, रोपांची दोरीने बांधणी करणे आदी कामे करत शेख यांनी चांगले उत्पन्न मिळेल या आशेने टोमॅटोचे पीक घेतले. चार महिन्यांत एकरी ८० हजार रुपये खर्चुन टोमॅटोची जोपासना केली. टोमॅटो तोडणीसाठी शेजारच्या गावांतून मजूर आणून वीस रुपये कॅरेटप्रमाणे मजुरी देत टोमॅटो बाजारपेठेत नेले. सुरुवातीला टोमॅटोला प्रतिकिलो १० ते १२ रुपये भाव साधला.
परंतु, सध्या बाजारात ७० ते ८० रुपये कॅरेटप्रमाणे भाव मिळत आहे. तर ४ ते ५ रुपये भावानेदेखील टोमॅटोला विचारत नसल्याने आयुब शेख यांनी टोमॅटोचा खर्चही निघत नसल्याने जनावरांना चारा म्हणून टोमॅटो टाकण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे सांगितले. शेतात टोमॅटोसाठी एकरी खर्च वाढला असून, यामध्ये मशागत, नांगरटी, रुटरसाठी १५ हजार रुपये, रोप खरेदी २० हजार, रोप बांधणी २० हजार, खते व औषधे डोस २५ हजार असा एकूण एकरी ८० हजार रुपये खर्च झाला. मात्र, अपेक्षित उत्पन्न येत नसल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे हडोळती परिसरातील चित्र आहे.
पिकांसाठी केलेला उत्पादन खर्चही हाती पडेना...
कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो. यंदा उधार- उसनवारी करून टोमॅटोची लागवड केली. मोठ्या मेहनतीने एकरी ८० हजार रुपये खर्चुन पहिल्यांदाच टोमॅटोचे पीक घेतले होते. परंतु, साधा उत्पादन खर्चही निघत नसल्याने मोठे नुकसान झाले. टोमॅटो जनावरांना खायला टाकावे लागत असल्याचे शेतकरी आयुब शेख यांनी सांगितले.
सध्या बाजारात ७० ते ८० रुपये कॅरेटप्रमाणे भाव मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने जनावरांना चारा म्हणून टोमॅटो टाकण्याची वेळ त्यांच्यावर आल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा टंचाईची स्थिती असतानाही शेतकऱ्यांनी टोमॅटोची पीके जगविली आहेत.