स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ७ नोव्हेंबरला २२वी ऊस परिषद येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार आहे. उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये प्रतिटन द्या, तसेच राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल करावेत, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानीने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. ऊस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी आंदोलनाची नवी दिशा स्पष्ट करणार आहेत.
मागील हंगामातील पैसे शेतकऱ्यांना मिळेपर्यंत संघर्षाची तयारी स्वाभिमानीने ठेवली आहे. ही परिषद ऐतिहासिक ठरविण्यासाठी स्वाभिमानीकडून नियोजन केले जात असून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही केले आहे. आक्रोश पदयात्रेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांत जनजागृती केली आहे. ही ऊस परिषद ऐतिहासिक ठरविण्यासाठी स्वाभिमानीकडून नियोजन केले जात आहे.
एक घर-दहा भाकऱ्या
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीची पदयात्रा मंगळवारी (दि. ७) सकाळी नांदणी येथे येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर २५ हजार शेतकऱ्यांना जेवणासाठी शिरोळ व हातकणंगले तालुक्यात प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून भाकरी गोळा करण्याचे आवाहन केले आहे.
स्क्रिनची व्यवस्था
विक्रमसिंह मैदानावर यंदा स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सिद्धेध्वर मंदिर, दसरा चौक, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर आदी ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.