अनिलकुमार मेहेत्रे
शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर वाढत असल्याने जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन प्रकल्प योजनेंतर्गत पैठण तालुक्यातील १० गाव शिवारातील ५०० एकर क्षेत्रावर विषमुक्त शेतीचा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट यांनी दिली.
शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर वाढल्याने जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. तसेच कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. जमिनीचा सजीवपणा प्रामुख्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणावर आणि गुणवत्तेवर अवलंबून असतो. जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाचा घटक असून, जमिनीमध्ये असलेल्या जिवाणूसाठी व जीवजंतूंसाठी महत्त्वाचे माध्यम आहे.
विषमुक्त अन्न, प्रदूषणविरहित जमीन व पाणी आणि एकूणच शाश्वत कृषी उत्पादनासाठी नैसर्गिक सेंद्रिय शेती हा पर्याय पुढे आला. याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने २०१८ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना केली. त्यानंतर २०२२ - २०२३ ते २०२७ २०२८ या कालावधीत राज्यभर हे मिशन राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली.
या अनुषंगाने पैठण तालुक्यात १० गट तयार केले असून, एका गावात ५० हेक्टर जमिनीवर असे एकूण ५०० हेक्टर जमिनीवर नैसर्गिक शेती मिशन राबविण्यात येणार आहे.
नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर थांबवून जमिनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे रसायनमुक्त सुरक्षित सकस नैसर्गिक शेतमाल उत्पादित करण्याचे उद्दिष्ट आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन प्रकल्प योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा व शाश्वत कृषी उत्पादन घेऊन विषमुक्त अन्न शेतात पिकवावे. तसेच अतिरिक्त वाढीव खर्च कमी करून निव्वळ नफा वाढवावा. - संदीप शिरसाट, तालुका कृषी अधिकारी, पैठण
कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रांकडे मार्गदर्शनाची जबाबदारी
नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी व शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्याचे काम कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र यांच्या समन्वयातून केले जाणार आहे. तसेच शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी स्तरावर जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करून स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध केली जाणार आहे.
हेही वाचा - अद्रक वॉशिंग सेंटरच्या माध्यमातून दिला ४०० जणांना रोजगार; शेतकऱ्याने शोधला स्वउद्योग