Join us

राज्याच्या भूजलात विषारी नायट्रेटचे प्रमाण वाढले; या सात जिल्ह्यात सापडले नायट्रेट बाधित पाणी नमुने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:14 IST

Nitrate in Water केंद्राच्या भूजल मंडळामार्फत २०२४ च्या भूजलातील पाणी पातळी व पाणी गुणवत्ता तपासणीमध्ये राज्यातील एकूण १,५६७ ठिकाणांच्या पाणी नमुन्यांपैकी ५६० पाणी नमुने विषारी नायट्रेट बाधित आढळून आले आहेत.

मुंबई : केंद्राच्या भूजल मंडळामार्फत २०२४ च्या भूजलातील पाणी पातळी व पाणी गुणवत्ता तपासणीमध्ये राज्यातील एकूण १,५६७ ठिकाणांच्या पाणी नमुन्यांपैकी ५६० पाणी नमुने विषारी नायट्रेट बाधित आढळून आले आहेत.

तर, राज्य शासनाच्या भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या २०२४-२५ च्या पाणी नमुने तपासणीनुसार वर्धा, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड आणि जळगाव या सात जिल्ह्यात पाण्याचे नुमने घेतले.

२९,४१४ पाणी नमुन्यांपैकी ३,४१८ पाणी नमुने नायट्रेट बाधित असल्याचे आढळून आल्याची धक्कादायक माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे.

आ. मिलिंद नार्वेकर, आ. सुनील शिंदे यांनी केंद्रीय भूजल मंडळाच्या 'वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल २०२४' मध्ये राज्यातील ७ जिल्ह्यातील भूजलात नायट्रेट असल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे.

शासनाने केलेल्या भूजल तपासणीत काय आढळून आले? त्या जिल्ह्यातील जनतेला शुद्ध पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याबाबत कोणती उपाययोजना केली आहे, असे तारांकित प्रश्न विचारले आहेत.

त्यावर दिलेल्या लेखी उत्तरात मंत्री पाटील यांनी ही बाब खरी असल्याचे म्हटले आहे. पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

प्रदूषणाला विविध घटक कारणीभूतपिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची दर महिन्याला तपासणी करण्यात येते. दूषित पिण्याच्या पाण्याच्या स्रोताभोवती' पाणी पिण्यास अयोग्य' असल्याचे फलक लावून ते स्रोत बंद केले आहेत. तेथे पर्यायी स्रोतांमधून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात असल्याची माहिती दिली आहे. नायट्रेटयुक्त रासायनिक खते, औषधांचा अतिवापर, औद्योगिक, शहरी प्रदूषण, जमीन वापरातील बदल, जंगलतोड, वायुप्रदूषण, भूगर्भातील बदल, सांडपाण्याचे गैरव्यवस्थापन अशा कारणांमुळे पाणी स्रोतामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढत असल्याचे अहवालात आढळून आले आहे, असे मंत्री पाटील यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा: मांस व अंडी असा दुहेरी नफा देणारी ही कोंबड्याची जात ठरतेय फायदेशीर; वाचा सविस्तर

टॅग्स :पाणीमहाराष्ट्रखतेबुलडाणाअमरावतीराज्य सरकारकेंद्र सरकारयवतमाळनांदेडबीड