गेल्या दोन - तीन दिवसांपासून मराठवाड्याच्या विविध भागात मृग नक्षत्राचा भाग बदलत पाऊस होतो आहे. यामुळे मृग पेरणी साठी सर्वत्र शेतकरी बांधवांची लगबग सुरू झाली आहे. मात्र अलीकडे घरोघरी असलेले पशुधन कमी झाल्याने परिणामी यंदा मका, भुईमूग, मूग, तूर, आदींच्या पेरण्या तर कपाशी पिकाच्या सर्या/काकर्या ह्या ट्रॅक्टर द्वारे होत आहे.
देखभाल खर्च वाढल्याने अलीकडे अनेक शेतकरी बांधवांनी आपली जनावरे विकून टाकली. परिणामी शेत मशागती करिता आता मात्र ट्रॅक्टर नवशेतीचा आधुनिक बैल म्हणून शेतात राबयला लागला.
आधुनिक यंत्राद्वारे ट्रॅक्टर च्या मदतीने आता शेतात सरी पाडणे, कांदा लागवडी करिता शेत तयार करणे, तूर लागवड करणे, मूग - भुईमूग पेरणी करणे, मका पेरणी करणे असे विविध शेती कामे केली जातात. सोबतच या पेरणी करत्या वेळी खते देखील दिले जात येत असल्याने या आधुनिक पद्धती शेतकरी बांधवांसाठी फायद्याच्या ठरत आहे.
मजुरांची समस्या देखील ट्रॅक्टरने मिटवली
दिवसेंदिवस शेतीकामासाठी मजुरांची कमी भासत आहे. वाढेलेली मजुरी त्यासोबत वेळेत पूर्ण न होणारे शेती काम यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच सर्वत्र ट्रॅक्टरचा उपयोग वाढल्याने आता मजुरांची समस्या देखील काहीअंशी ट्रॅक्टरने मिटवली आहे. सोबतच भविष्यात ट्रॅक्टरने शेती करतांना अजून काही बदल अपेक्षित आहे. ज्यात कदाचित मजुरांची आवश्यकता देखील भासणार नाही. - आप्पासाहेब डोंगरे (शेतकरी रा. गाजगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर)