सध्या शिवारात खरीप हंगामातील पिकांच्या मळणीची लगबग सुरू आहे. जिकडेतिकडे केवळ मळणी यंत्राची धामधूम सुरू आहे; पण पारंपरिक मळणीसाठीचे खळे कुठे दिसेनासे झाले आहे.
पूर्वी शेतात पीक तयार झाले की धान्याची रास करण्यासाठी खळे तयार करत असे. तेच त्यांचे मळणी यंत्र असे. पूर्वीची शेती पद्धती लक्षात घेतली की प्रकर्षाने मळणीसाठी तयार केलेले खळे आठवते.
मळणीयंत्र येण्यापूर्वी प्रत्येक शेतकरी शेतात गोलाकार खळे निर्माण करत असे. या खळ्याच्या मध्यभागी एक भक्कम उभे लाकूड रोवले जात असे. त्याच्या भोवती गोलाकार जमीन लाकडी चोपणीने चोपून गुळगुळीत केली जात असे. ती शेणाने सारवून घेतली जायची.
मळणीसाठी खळ्याची निर्मिती केली जायची. या खळ्यात खुडलेल्या ज्वारी, बाजरीची कणसे पसरली जायची. मध्यभागी रोवलेल्या लाकडाच्या अवतीभवती बैल बांधले जायचे.
त्यांनी धान्याला वा कणसाला तोंड लावू नये म्हणून तोंडाला मुसक्या बांधल्या जात असत. बैल खळ्यात पसरलेल्या कणसावर गोलाकार फिरत. त्यांच्या फिरण्याने कणसातून आपसूकच दाणे वेगळे होत.
यानंतर वाऱ्याच्या वेगाच्या दिशेला उंचावर उभे राहून धान्य उपणले जायचे. फोलपाटे, कचरा व निरुपयोगी हलका भाग वाऱ्याने पुढे जाऊन धान्य खाली साठून राहत होते. थोडक्यात खळे म्हणजे मळणी यंत्रच होते.
सर्व काम एकरांवर आधारित चार ते पंधरा दिवस चालत असे. त्यावेळी संबंधित शेतकरीही राहण्यासाठी रानात वा शेतात जात असे. त्यामुळे संपूर्ण शिवारात तात्पुरत्या चुली पेटत व गजबज दिसत असे.
खळ्यावर धान तयार करण्यास मनुष्यबळ तसेच वेळ व श्रम लागते. बळीराजाला श्रमाची सवय होती. पाळीव बैलांकडूनही विविध कामे करून घेतली जात असत.
आता शेतीची बहुतेक कामे यंत्राने केली जात आहे यामुळे बैलांची संख्याही रोडावत आहे. सध्याच्या यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांची श्रम शक्तीही कमी झाली आहे.
सध्याच्या यांत्रिकीकरणामुळे मळणीसाठी निर्माण केले जाणारे खळे गायब झाले आहे. परंत पूर्वीच्या लोकांनी निर्माण केलेले खन आजही काही ठिकाणी दिसतात. - अनिल शिंदे, शेतकरी