सध्या शेती हा व्यवसाय करत असताना जनावरांचा भासत असलेला तुटवडा, वेळ व येणारा मजुरीचा खर्च टाळण्यासाठी भातशेती व्यवसायातील तण मळणीला शेतकऱ्यांनी छेद दिला • आहे. यामुळे मळणी ही मुख्य प्रक्रिया आता हद्दपार झाली असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या युगात भातशेती करणे फारच कठीण होऊन बसले आहे. महागडी खते, बी-बियाणे, मजुरांचा तुटवडा आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे बेमोसमी पावसाने पिकांची होणारी नासाडी आदी समस्यांमुळे भातशेती हा व्यवसाय अपार कष्ट करूनदेखील न परवडणारा व्यवसाय झाला आहे.
भातशेती करत असताना रावणी करणे, पेरणी करणे, लावणी (आवणी) करणे, कापणी (लाणी) करणे, झोडणी करणे व अखेर तण मळणी करणे आदी क्रमशील प्रक्रिया शेतकऱ्यांना कराव्या लागत असतात, मात्र तण मळणीसाठी लागणारी जनावरे, वेळ व मजुरीच्या खर्चामुळे या भातशेती प्रक्रियेतील तण मळणी या मुख्य प्रक्रियेला शेतकऱ्यांनी छेद देत सरळ तणाचे मोधळ बांधून व्यापाऱ्याला विक्री करण्यास पसंती दिली असल्याचे दिसत आहे.
वेळ व खर्चाची बचत- प्रत्येक शेतकरी झोडणीसाठी आपल्या जागेत योग्य ठिकाणी शेतखळे तयार करून झोडणी व तणाची साठवण करीत असतो.- तयार केलेल्या खळ्यात एक लाकडाचा खांब पुरुन त्याला किमान ४ ते ५ जनावरे दावणीला बांधून गोल फिरवून तण पायाखाली तुडवले जायचे, जेणेकरून झोडणीत तणाला शिल्लक असलेले भात या मळणीत शेतकऱ्यांना मिळत असे, मात्र वेळ व खर्चाची बचत तसेच जनावरांचा तुटवडा भासत असल्याने या प्रक्रियेला छेद दिला जात आहे.
बेमोसमी पावसाची असलेली भीती, जनावरांचा भासत असलेला तुटवडा, वेळ व खर्चाच्या तुलनेत तण मळणीतून भात मिळत नसल्याने तण मळणी ही पूर्वीपासूनची मुख्य प्रक्रिया करणे शेतकरी टाळीत आहेत. - दिनेश वारघडे, शेतकरी मोहोट्याचा पाडा