Join us

शेतकऱ्यांनो प्रशिक्षण सुरूय, मका लागवडीतून चारा निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 4:51 PM

शेतकऱ्यांना मका लागवड करण्यास प्रोत्साहित करून त्यापासून मुरघास निर्मिती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी पांरपरिक धान पिकाला फाटा देत इतर पिकांकडे वळावे यासाठी कृषी विभाग व शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. याला आता सामाजिक संस्थांनी सुद्धा हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील १०० शेतकऱ्यांना मका लागवड करण्यास प्रोत्साहित करून त्यापासून मुरघास निर्मिती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत आतापासूनच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे मका लागवडीतून चारा निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. याच माध्यमातून तिरोडा तालुक्यातील १०० शेतकऱ्यांची निवड करून त्यांना मका लागवड व मुरघास निर्मिती करण्याचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. तालुक्यातील १०० शेतकऱ्यांनी १०० एकर शेतीमध्ये मका लागवड केली, आता मका कापणीला आला असून, त्यापासून जनावरांसाठी पौष्टिक असलेले मुरघास खाद्य निर्मिती करण्यात येणार आहे. सरासरी १ एकर शेतीमध्ये २० टन मुरघास तयार होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

सोबतच तयार केलेला मुरघास विक्रीची सुद्धा सोय करून दिली आहे. त्यामुळे या उपक्रमाची शेतकऱ्यांना मदत होत आहे. पीक पद्धतीत बदल केल्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता सुद्धा वाढण्यास मदत होईल. त्यासोबतच मका लागवडीसाठी उत्पादन खर्च कमी होत असल्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त शेतकरी मका लागवडीकडे वळतील. मका पिकापासून बनविलेला मुरघास हा जनावरांसाठी पौष्टिक असल्यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादन वाढीसाठी सुद्धा मदत करेल. शिवाय यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळण्यास सुद्धा मदत होईल, असे मत कार्यक्रम अधिकारी कैलास रेवतकर यांनी व्यक्त केले. 

मुरघास कसा तयार करावा? 

वैरणीचा कस फारसा कमी न होउ देता हवाबंद आणि ज्यामध्ये पाणी झिरपणार नाही, अशा खडडयात ओली वैरण साठवून ठेवण्याच्या पध्दतीस सायलेज अगर मुरघास करणे असे म्हणतात. ओली वैरण खडडयात व्यवस्थित बंद करून झाकली असता ती आंबते आणि त्यामूळे तिला सडल्यासारखा वास येतो. तसेच तिला पिवळा रंग चढतो. चांगला मुर्घास तयार करण्यासाठी वैरण कापून ती खडडयात नीट बंद करणे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. तेथे हवा शिरू शकणार नाही आशा जागेत वैरण ठेवली असता मुरघास उत्कृष्ट तयार होइल. पंरतू प्रत्यक्षात हे शक्य नसते म्हणून खडडा भरतांना वैरण बारीक करून ती खूप दाबतात म्हणजे जास्तीत जास्त हवा बाहेर पडते. त्याचप्रमाणे खडडयात पाणी झिरपतां कामा नये. कारण खडडयात बंद केलेल्या वैरणीत पाणी झिरपल्यास अगर हवा जास्त प्रमाणात राहील्यास मुघास कमी प्रतीचा होतो किंवा बरीचशी वैरण सडते.

 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीमकादुष्काळ