Join us

विशेष कापूस प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 9:12 PM

बोंडाची संख्या व आकार वाढवुन उत्पादनात वाढ होईल या बद्दल मार्गदर्शन केले.

परभणी : कापसाच्या उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीकोनातून केंद्र सरकारकडून विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात व तामिळनाडू या राज्यात राबविण्यात येत आहे. तर भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना कापसाबद्दलच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 

दरम्यान, हे प्रशिक्षण  19 डिसेंबर 2023 रोजी कृषि विज्ञान केंद्र, परभणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे सावंगी (भुजबळ). ता. गंगाखेड जि. परभणी येथे दादा लाड तंत्रज्ञानाने केलेल्या कापूस लागवड प्रक्षेत्रावर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मौजे सावंगी, मसला, पिंपरी येथील शेतकऱ्यांनी  मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. 

कापसाच्या उत्पादन वाढी करता योग्य अंतर, गळ फांदी काढून टाकणे, शेंडा खुडून झाडांची उंची पारंपारिक पध्दतीपेक्षा कमी ठेवून फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व आकार वाढून उत्पादनात वाढ होईल या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच कापूस वेचणी पूर्ण झालेल्या कपाशीच्या अवशेषांचा कॉटन स्लेशर च्या मदतीने शेतातच बारीक करून जमिनीचा कर्व वाढविण्याकरिता उपयोग करावा असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले, व कापूस काढणीनंतर पराटीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अनियंत्रित पध्दतीने न जाळता पायरोलिसिस या नियंत्रित ज्वलन पध्दतीव्दारे वायोचार तयार होतो. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉ. उषा सातपुते, तांत्रिक प्रशिक्षक, विशेष कापूस प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांनी कापूस पिकातील दादा लाड लागवड तंत्रज्ञांना विषयी सविस्तर माहिती दिली.

शेतकऱ्यांनी कापूस हे पिक डिसेंबर महिन्याच्या शेवटी पुर्ण वेचणी करुन काढूण टाकावी, कपाशीची फरदड घेणे टाळावे जेणे करुन पुढील हंगामामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळाता येईल, व स्वच्छ कापूस वेचणी करण्याबाबत मार्गदर्शन विशेष कापूस प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षण कुंडलिक खुपसे यांनी केले. शेतकऱ्यांनी पुढील हंगामात दादा लाड तंत्रज्ञान लागवड पध्दतीचा वापर करुन आपल्या उत्पादकतेमध्ये वाढ करावी असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन श्री. अमित तुपे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. विकास खावे तर आभार प्रदर्शन श्री. नामदेव काळे यांनी केले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी