मुंबई : कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदी व्ही. राधा यांची मंगळवारी राज्य सरकारने नियुक्ती केली. त्यामुळे साडेतीन महिन्यांनंतर या विभागाला पूर्णवेळ प्रमुख मिळाले आहेत. अनेक बदल्यांचा अनुभव असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. एकूण सात आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.
शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांच्याकडे कृषी विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. खरीप हंगाम सुरू झाला असताना आणि राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असताना, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असताना कृषी विभागाला पूर्णवेळ प्रमुख नाहीत याकडे 'लोकमत'ने सर्वप्रथम लक्ष वेधले होते.
राधा या गेली दहा वर्षे त्या दिल्लीमध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत होत्या. सध्या त्या नीती आयोगाच्या सचिव होत्या. तुकाराम मुंढे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव होते. आता त्यांची बदली विकास आयुक्त (असंघटित कामगार) या पदावर करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांची सध्याची पदे व बदलीनंतरची पदे
अधिकाऱ्याचे नाव | सध्याचे पद | बदलीनंतरचे पद |
व्ही. राधा | केंद्रीय नीती आयोग सचिव, दिल्ली | प्रधान सचिव, कृषी विभाग |
तुकाराम मुंढे | सचिव, पशुसंवर्धन व दुग्धविकास | आयुक्त, असंघटित कामगार |
अमन मित्तल | उपसचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता | मुख्य कार्यकारी अधिकारी, मित्र |
रणजित कुमार | प्रतिनियुक्तीः दिल्ली | अति. महासंचालक, यशदा, पुणे |
निमा अरोरा | संचालक, माहिती-तंत्रज्ञान | सहआयुक्त, वस्तू व सेवा कर, माहिती-तंत्रज्ञानचा अतिरिक्त कार्यभार |
अमगोथू श्रीरंगा नायक | सहआयुक्त, वस्तू व सेवा कर | आयुक्त, कुटुंब कल्याण व संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन |
रोहन घुगे | नियुक्तीच्या प्रतीक्षेत | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे |