जळगाव जिल्ह्याच्या रावेर शहरातील उत्तरेला निसर्गदत्त म्हणून उभ्या असलेल्या सातपुड्याच्या पर्वतरांगा अन् दक्षिणेला असलेल्या तापीच्या खोऱ्यातील सुपीक पठार पाहता, तालुक्याला केळीचे माहेरघर वा केळीच्या आगाराची वैभवसंपन्नता आहे.
उत्तरेला उभ्या असलेल्या सातपुड्याच्या चिरेबंदीला वृक्षतोडीचा मोठा फटका बसल्याने तब्बल १५ वर्षापासून सातत्याने घोंघावत येणाऱ्या वेगवान वाऱ्याची वादळे, अवकाळी पाऊस तथा गारपिटीचे बसत असलेले तडाखे पाहता, केळीच्या आगाराला घरघर लागत आहे.
गेल्या दीड दशकांपासून सन २०१० मध्ये तालुक्यातील पूर्व भागात चोरवड, अजनाड, अटवाडे, दोधे परिसरात झालेल्या वादळी पावसासह गारपिटीच्या आकांडतांडवाने घातलेला हैदोस केळी उत्पादकांसह शासनाची व लोकप्रतिनिधींची झोप उडवणारा ठरला.
केळीबागांना सातत्याने चक्रीवादळं, वादळी वारे, अवकाळी पाऊस तथा गारपिटीच्या बसणाऱ्या तडाख्यांच्या अस्मानी तसेच सुल्तानी संकटांच्या श्रृंखलेने केळी बागायतीलाच घरघर लागल्याची शोकांतिका आहे.
वातावरणातील बदलांमध्ये वृक्षतोड, जलसिंचनाचा अभाव या बाबींचा अंतर्भाव असल्याने किमान आपल्या केळीच्या माहेरघराचे गतवैभव टिकवण्यासाठी तरी आपण सातपुड्यात सीडबॉलसारखे उपक्रम राबविले पाहिजे. शेतशिवारात वृक्ष लागवड करून तथा पावसाच्या वाया जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण करणे गरजेचे आहे. - प्रा. महेश महाजन, मुख्य शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पाल, ता. रावेर.
सातपुड्याच्या डोंगरदरीतील वृक्षतोडीमुळे उजाड झालेल्या वनात होणाऱ्या उष्णतेच्या परावर्तनामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन हवेच्या शीतलहरी आकर्षित होऊन गारपीट तथा अवकाळी पावसाचे आवर्त तयार होतात. - प्रा. चतुर गाढे, भूगोल तज्ज्ञ, व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर.
बळीराजाची कोट्यवधी रुपयांची होतेय हानी
• दरवर्षी हजार, दीड हजार हेक्टर केळीचे क्षेत्र या आस्मानी व सुल्तानी संकटांना बळी पडत असल्याने करोडो रुपयांची बळीराजाची अपरिमित हानी होत असली, तरी उद्याच्या आशेवर जगणारा केळी उत्पादक धिरोदत्तपणे तोंड देऊन कर्जाचा बोजा छातीवर ठेवून एकांडी शिलेदाराप्रमाणे निसर्गाशी झुंज देत आहे.
• दरवर्षी होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे पंचनाम्यांचे सोपस्कार, शासनाची तुटपुंजी नुकसानभरपाई व संरक्षित विम्याचे अल्प संरक्षण पाहता वेळ मारून नेली जात असली, तरी केळीच्या माहेरघरातच होत असलेली घरघर थांबवण्यासाठी आज कोणीही पुढे येत नसल्याची शोकांतिका आहे.
• वन वा वन्यजीव विभाग तथा सामाजिक वनीकरण विभागांतर्गत दरवर्षी वृक्ष लागवडीची कोटी कोटीचे उड्डाणे घेतली जात असली, तरी त्याची वस्तूतः अंमलबजावणी होते की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
• किंबहुना, या वृक्ष लागवडीचे वा वृक्ष संवर्धनाचे जिओ टॅगिंग प्रणालीतून कितपत उच्चस्तरीय लेखापरीक्षण केले जाते? हा संशोधनाचा विषय असल्याची टीका होत आहे. किंबहुना, मध्य प्रदेशातील आदिवासी हे घुसखोरी करून सर्रास वृक्षतोड करून शेती तयार करतात. यामुळेही सातपुडा बोडका होत आहे.
ग्लोबल वार्मिंग हा वैश्विक स्तरावरील विषय असल्याने एकट्या सातपुड्याच्या बोडका होण्याने तालुक्यावर अस्मानी संकट घोंघावते, असे म्हणता येणार नाही. अंशतः ते कारण कारणीभूत असू शकते. त्याकरिता वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची चळवळ उभी राहण्याची गरज आहे. यासाठी शासनानेही पुढकार घेणे आवश्यक आहे. - अजय बावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, रावेर.
सातपुडा वाचवा !
वातावरणातील बदलांमुळे निर्माण होणारे चक्रीवादळ, अवकाळी पाऊस अन् गारपिटीच्या अस्मानी संकटांना परतवून लावण्यात उत्तरेकडील सातपुड्याची निसर्गदत्त चिरेबंदी असमर्थ ठरली असल्याने आस्मानी संकटांचे तांडव पाठशिवणीचा खेळ खेळत आहे. यामुळे सातपुडा वाचवण्याचीचळवळ उभी राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : रेबिज बाधित जनावरांचे दूध सेवन केल्यास रेबिज होतो का? वाचा काय सांगताहेत तज्ञ