रासायनिक खतांचा वापर भाजीपाला व अन्य पिकांसाठी केला जातो. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा अतिरेक केला जात असल्याने भाजीपाला खाण्यातून मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय भाजीपाला तसेच शेतमालासाठी बाजारात चांगली मागणी आहे. जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.
शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खताचा वापर शेतकरी भाजीपाला पिकासाठी करत आहेत. त्यामुळे उत्पादन व दर्जा चांगला मिळतो. रासायनिक खतांचा वापर मोजकेच शेतकरी करीत असले तरी भाजीपाला पिकावर कीटनाशक फवारणी मात्र कोणतेच शेतकरी करत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी सेंद्रिय पद्धतीनेच भाजीपाला उत्पादन घेत आहेत. शहरात खास सेंद्रिय माल विक्री केंद्र नसले तरी शहरातील नाक्या-नाक्यावर ग्रामीण भागातील विक्रेत्या महिलांकडे सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध होत आहे.
सेंद्रिय भाजीपाला लागवडीसाठी बियाण्याचे वाटप
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय भाजीपाला लागवडीसाठी कोणतेही अनुदान उपलब्ध होत नसले तरी बियाणांचे किट मात्र वाटप केले जाते.
जिल्ह्यात हजार शेतकरी घेतात सेंद्रिय भाजीपाला
- जिल्ह्यात ५००० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड केली जाते.
- सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेणारे हजारपेक्षा अधिक शेतकरी आहेत.
- सेंद्रिय खते वापरून कीटकनाशक फवारणी न करता उत्पादन घेतात.
अधिक वाचा: पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय
सेंद्रिय भाजीपाला आरोग्यासाठी लाभदायी
रासायनिक खते, कीटकनाशकांचे अवशेष भाजीपाल्यात उतरत असल्याने सेंद्रिय भाजीपाला आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
सेंद्रिय भाजीपाला तसेच शेतमालासाठी बाजारात चांगली मागणी आहे. सेंद्रिय शेतीचे महत्त्व उमगल्याने अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत. जिल्ह्यातील काही गावातूनही १०० टक्के सेंद्रिय शेतीवर भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे भाजीपाला बियाणांचे वाटप करण्यात येत असून, लागवडीबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. - सुनंदा, कुन्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी
सेंद्रिय खतांच्या वापरामुळे भाजीपाला उत्पादन चांगले येते, दर्जाही चांगला असतो. विक्रीसाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत. शेताच्या बांधावरच विक्री होते. भाजीपाल्यासह सेंद्रिय शेतमालाला मागणी आहे. - शरद माचिवले