Join us

Tur prices: भाव आहे, पण विकायला तूर नाही! उत्पादनात घट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 10:03 AM

१६ लाख टनांचा तुटवडा, ८ लाख टन आयातीची शक्यता

सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार रुपये दर मिळत आहे. हे दर दबावात आणण्यासाठी व आवक वाढविण्यासाठी बाजारात सायकॉलॉजिकल प्रेशर तयार केले जात आहे. देशात उत्पादन घटल्याने यंदा १६ लाख टन तुरीचा तुटवडा जाणवणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी किमान ८ लाख टन तुरीची आयात होण्याची शक्यता असून, समांतर दरामुळे ही आयात महागात पडणार असल्याने दरावर फारसा परिणाम होणार नाही. दर नियंत्रणासाठी केंद्र सरकार स्टॉक लिमिटवर भर देत आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने वर्ष २०२३- २४ च्या हंगामात ४३ लाख टन तुर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. वास्तवात, उत्पादन ३० लाख टन झाले असून, देशाची वार्षिक गरज ही ४६ लाख टन तुरीची आहे. त्यामुळे मोठा तुटवडा निर्माण होणार आहे.

दर पाडणे कठीण

आयात करून देशांतर्गत बाजारातील तुरीचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारने डाळींवरील आयात शुल्क रद्द केले असून, आयातीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मोझांबिक, म्यानमार व मलावी या देशांनी भारताला कमी दरात तूर विकत देण्यास स्पष्ट नकार दिल्याने आयात थांबली आहे. त्यामुळे सरकारने स्टॉक लिमिटवर भर दिला असला तरी डाळींच्या जागतिक बाजारातील तेजीमुळे केंद्र सरकारला देशांतर्गत बाजारातील तुरीचे दर पाडणे कठीण जात आहे.

आयात महाग

जागतिक पातळीवर सध्या तुरीचे दर ९,५०० ते १० हजार रुपये प्रतिक्चिटल आहेत. भविष्यात हे दर कमी होण्याची शक्यता नाही.

■ पॅकिंग व वाहतूक खर्च विचारात घेता आयात केल्या जाणाऱ्या तुरीला किमान प्रतिक्विंटल १२ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

■ २०२३-२४ मध्ये भारताने ७.७५ लाख टन तूर आयात केली होती. चालू वर्षात अधिकाधिक ८ लाख टन आयात होऊ शकते.

दरात वाढ, भाव पोहोचू शकतील १३ हजारांवर

उत्पादनातील घट, साठा कमी व आवक कमी या कारणांमुळे राज्यात तुरीच्या दरात चांगलीच वाढ होताना दिसून येत आहे. सामान्यपणे मार्च महिन्याच्या अखेरीस कमाल दहा हजार चारशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असलेले तुरीचे दर सध्या कमाल १२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. पुढेही तुरीच्या दरातील तेजी कायम राहणार असल्याने तुरीचे दर १३ हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

यावर्षी जानेवारी २०२४ या महिन्याच्या शेवटपर्यंत तुरीला सरासरी आठ हजार ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळत होते. मात्र, यानंतर दरात झालेली वाढ अजूनही टिकून आहे. मध्यंतरी दोन महिने तुरीचे दर १० हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिरावले होते. मात्र, आता आवक कमी झाल्याने तुरीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

टॅग्स :तूरशेतीबाजार