Join us

हमीभावात नव्हे, बाजारभावात होणार तूर खरेदी, शेतकऱ्यांना होणार फायदा..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 3:20 PM

तुरीला हमीभाव ७ हजार : बाजारात ८ हजारांवर दर

नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेंतर्गत पणन महासंघाच्या संस्थांकडून तूर खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील तीन केंद्रांना परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे शासन यंदा प्रथमच हमी भावात नव्हे तर, बाजार भावात तूर खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

नाफेड अंतर्गत तूर खरेदीसाठी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यासह खरेदी विक्री संघ (औंढा नागनाथ), खरेदी केंद्र (जवळा बाजार), प्रगती स्वयंरोजगार सेवा सह. सं. म. (हिंगोली), खरेदी केंद्र (बळसॉड), श्री. संत भगवानबाबा स्वयं. सेवा सं. म. (कोथळज), खरेदी केंद्र (सेनगाव) इत्यादी खरेदी केंद्राला परवानगी देण्यात आली असून शेतकऱ्यांची नावे नोंदणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

शासनाने आता खरीप कडधान्य हमीभावापेक्षा बाजारभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाभ होईल आणि व्यापाऱ्यांमध्ये चुरस निर्माण होईल व शेतकऱ्यांना फायदा होईल. तुरीचा हमीभाव शासनाने ७ हजार रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. बाजारात मात्र तूर ८ हजार रुपयांपेक्षा जास्त भावाने खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांची खरेदीसाठी नोंद झाली असेल तर, नवीन शेतकऱ्यांना मात्र आधार कार्ड, अचूक बैंक खाते आणि ऑनलाइन पीक पेरा असलेला उतारा जोडणे आवश्यक आहे.

यावर्षी नाफेड दररोज बाजारभाव सकाळी खरेदी केंद्रांना कळवेल, त्याच दराने तूर खरेदी केली जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंद करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी केले आहे.

टॅग्स :तूरबाजारशेतकरी