Farmer story : मंठा येथील प्रगतशील शेतकरी भगवान बोराडे यांनी एक एकर शेतीमध्ये हळद लागवड केली होती. त्यांना हळदीच्या पिकातून (Halad Crop) तब्बल आठ लाख रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यांनी यावर्षी जवळपास दीड एकर शेतीमध्ये हळदीची लागवड केलेली आहे.
भगवान बोराडे हे अल्पभूधारक शेतकरी (Farmer) असून त्यांना पाच एकर जमीन आहे. ते दरवर्षी हळद पिकाचे (Halad Crop) उत्पादन घेतात. यावर्षी त्यांनी जवळपास दीड एकर शेतीवर हळदीची लागवड केली. त्यांना यंदा ५१ क्विंटल उत्पन्न एक एकरमध्ये झालेले आहे.
दीड लाखांचा खर्च
मागील वर्षी बोराडे यांनी एक एकर हळदीची (halad) लागवड केली होती. त्यातून त्यांना ५१ क्विंटल उत्पन्न झाले.
त्यातून त्यांनी ३६ क्विंटल हळद १९ हजार ५०० रुपये किलोप्रमाणे प्रमाणे विक्री केली. त्यातून त्यांना ७ लाख २ हजार रुपये मिळाले.
तर जवळपास १ लाख रुपयांची पंधरा क्विंटल हळद पुढील लागवडीसाठी राखून ठेवली. यामुळे एक एकर शेतीमध्ये हळदीच्या उत्पादनातून जवळपास आठ लाख रुपयांचे उत्पन्न झाले. त्यांना एक एकर हळदीसाठी जवळपास १ लाख ५० हजार रुपये खर्च आला आहे.
हक्काची बाजारपेठ आवश्यक
मंठा तालुक्यात अनेक शेतकरी हळदीचे उत्पादन घेत आहेत. परंतु शेतमाल विक्रीसाठी त्यांना वसमत किंवा हिंगोली या ठिकाणी जावे लागते. मंठा हे तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्याने विविध ठिकाणचे व्यापारी व नागरिक येथे येतात. या ठिकाणी हळदीचे व्यापारी आले तर शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावरच हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल. - भगवान बोराडे, शेतकरी मंठा.