Turmeric Center:
हिंगोली : वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन व प्रशिक्षण केंद्राला ७०९ कोटी २७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, या निर्णयाने संशोधन केंद्राच्या निर्मितीसाठी पुढचे पाऊल पडले आहे.
हळदीचे उत्पन्न वाढीबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचा विश्वास हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरुवारी हिंगोली येथे पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली.
हिंगोली येथील हळद संशोधन केंद्रासाठी सुरुवातीला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या प्रकल्पासाठी २७ ते २८ बैठका पार पडल्या. त्यानंतर अभ्यास करून प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा सादर करण्यात आला. त्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
या आराखड्यानुसार जिल्ह्यातील हळदीचे उत्पन्न दुप्पट करणे, ४ लाख ऊती संवर्धित रोपांची निर्मिती करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळेची उभारणी करणे, प्रकल्पासाठी ७५ शासकीय आणि ५० कंत्राटी पदे भरली जाणार आहेत. तसेच ऊती संवर्धित (टिश्यू कल्चर) रोपे तयार करण्यासाठी २ हजार महिलांना रोजगार प्राप्त होणार आहे.
प्रकल्पासाठी ६५ एकर जमीन संशोधन केंद्राच्या ताब्यत असून, पाच वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे. मंजूर झालेला निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रकल्पाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे इमारत बांधकाम, शास्त्रज्ञ आणि शेतकरी निवासस्थान उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी शासनाने अतिरिक्त निधी मंजूर केल्याने जिल्ह्यात हळद उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे. शिवाय रोजगार निर्मिती होऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.
शासनाचा ऐतिहासिक निर्णयहळद संशोधन केंद्राला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होणे हे आपल्या जिल्ह्याचे भाग्य समजतो. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, फलोत्पादन मंत्री दादा भुसे यांचे आभार मानतो. जिल्ह्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयाने येत्या पाच वर्षात जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलणार आहे, असे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले
आनंदाच्या शिध्यातही हळद
येथील हळद उत्पादनाला चालना देण्यासाठी आनंदाचा शिधा या योजनेत साखर, तेल, रवा याबरोबरच २ किलो हळद पावडरचा पुरवठा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील मुलांना हळदयुक्त दुधाचा पुरवठा केला जाणार आहे.
लॉजिस्टिक पार्कही उभारणार
वसमत तालुक्यातील भेंडेगाव परिसरात लॉजिस्टिक पार्कही उभारले जाणार असून, या पार्कच्या उभारणीनंतर रेल्वेद्वारे थेट बाजारपेठेपर्यंत शेतमाल पोहोचविता येणार आहे.