वाशीम तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी बेणे मिळत नाही, असे शेतकरी हळद बेणे मिळण्यासाठी इतरत्र गावात चौकशी करत असल्याचे दिसून येते. यातच मराठवाड्यातील वसमत येथून काही शेतकऱ्यांनी यापूर्वी हळद बेणे कमी दरात बोलविले आहे. परंतु आता वाढता पेरा पाहता हळद बेण्याच्या दरात सुद्धा वाढ झाली. शेतकऱ्यांना या दरात हळद बेणे घेणे परवडणार नसल्याने इच्छा असतानाही वाढीव दरामुळे हळद लागवडीपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी सुरुवातीला हळदीला ६५०० रुपये प्रति क्विंटल दर होते. त्यानंतर १५ हजाराचा टप्पा ओलांडल्याने मोठ्या संख्येने शेतकरी हळद लागवडीकडे वळत आहेत. यंदाही हळदीचे दर १५ ते १७ हजारापर्यंत झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हळद पीक लागवडीकडे आपले लक्ष केंद्रित केले. यावर्षी लागवडीचे क्षेत्र सतत वाढत असल्यामुळे हळद बेणे तुटवडा जाणवत आहे.
दुसरीकडे गेल्यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी हळद लागवडी केली होती, त्या शेतकऱ्यांकडे घरचेच बेणे आहे. त्यामुळे त्यांना हळदीच्या बेण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. यंदाही हळद लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
उत्पन्नात भर पारंपरिक पिकांबरोबरच आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करावी, असा सल्ला कृषी विभागातर्फे दिला जातो. तालुक्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पिकांबरोबरच फळबाग लागवड, भाजीपालावर्गीय पिके घेतात. हळद लागवडीकडे देखील शेतकरी वळले आहेत. हळद शेतीमुळे उत्पन्नात भर पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मागच्या तीन दिवसातील हळदीचे बाजारभाव असे आहेत.. (रु./क्विंटल)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
१२ जून २४ | ||||||
भोकर | --- | क्विंटल | 2 | 11600 | 11700 | 11650 |
हिंगोली | --- | क्विंटल | 1500 | 13300 | 15930 | 14615 |
११ जून २४ | ||||||
पुर्णा | राजापुरी | क्विंटल | 72 | 13800 | 15700 | 15000 |
१० जून २४ | ||||||
हिंगोली | --- | क्विंटल | 1950 | 13400 | 16100 | 14750 |
रिसोड | --- | क्विंटल | 3700 | 13250 | 15850 | 14500 |
वाई | लोकल | क्विंटल | 500 | 16000 | 18500 | 17500 |
बसमत | लोकल | क्विंटल | 702 | 12000 | 16910 | 14455 |
सेनगाव | लोकल | क्विंटल | 241 | 10500 | 15500 | 13500 |
जावळा-बाजार | लोकल | क्विंटल | 240 | 13000 | 15000 | 14000 |
पुर्णा | राजापुरी | क्विंटल | 25 | 14690 | 15460 | 15000 |