सांगली जिल्हा हा हळद उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे. त्यातच मिरज पश्चिम भागातील जमिनी कृष्णा, वारणा नदीच्या पट्ट्यामुळे सुपीक आहेत. यावर्षी १०० एकरपेक्षा जास्त क्षेत्रात हळद लागवड केली आहे.
मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, तुंग, पद्माळे, नांद्रे, सावळवाडी, माळवाडी, दुधगाव, समडोळी, कवठेपिरान आदि परिसरांत यावर्षी मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली आहे. अक्षय तृतीयेपासून हळद लागवड करण्यात येते.
पोषक वातावरणामुळे हळद बहरल्याचे दिसत आहे. गतवर्षी सांगली मार्केट यार्डमध्ये हळदीला उच्चांकी दर मिळाला. वीस हजारांपासून ७० हजारापर्यंत चांगल्या दर्जाची हळद विकली गेली. त्यामुळे शेतकरी पुन्हा हळदीकडे वळला आहे. हळदीला दर मिळाल्यामुळे बियाणे महाग झाले.
राजापुरी, आनी, सेलम हळद लागवड करण्यात आली. त्याचे बियाणे सहा हजार ते नऊ हजार रुपयांना मिळत होते. हळद लागवडीसाठी खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे पुढील वर्षीही चांगला दर अपेक्षित आहे. हळद हे नगदी पिक असल्यामुळे तसेच चांगला दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हळद क्षेत्रात वाढ केली आहे.