Join us

हळदीवर कंदमाशीचा प्रादुर्भाव झालाय? या करा उपाययोजना..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 3:58 PM

वातावरण बदलाचा हळद पिकावर कंदमाशीचा प्रादुर्भाव

वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा शेती पिकावर परिणाम झाला असून, ढगाळ वातावरणामुळे हळद पिकावर सध्या कंदमाशीचा प्रादुर्भाव वाढल्याने, शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे.

ढगाळ वातावरणामुळे हळद पिकावर कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. अशा परिस्थितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांनी पिकावर हळद कंदमाशी दिसून येत असल्यास खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. असे सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी आर. एम. देशमुख यांनी सुचविले आहे. 

दोन किलो एरंडाच्या बिया फोडून बारीक करून, त्यामध्ये दोन लिटर पाणी ओतून ढवळून घ्यावे. त्यामध्ये २५ ग्रॅम यीस्ट आणि ५० ग्रॅम डाळीचे पीठ टाकून ते चांगले ढवळून घ्यावे. सदरील मिश्रण दोन ते तीन दिवस ठेवून आंबवावे. त्यानंतर हे मिश्रण शेतामध्ये पसरट भांड्यात ओतून शेतात जागोजागी ठेवावे. कंदमाशीचे पतंग आकर्षित होतात व त्यामध्ये पडून नष्ट होतात.

हळदीवरील कंद माशी, करपा आणि कंदकुजचे कसे कराल व्यवस्थापन

काय कराव्यात उपाययोजना?

- प्रत्येक १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मि.ली. किंवा डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) १५ मि.ली. यापैकी एका कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे.

- उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.

- पीक तण विरहित ठेवावे. जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी.

- याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी.- हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.

- तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे.

- ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.

टॅग्स :पीक व्यवस्थापनहवामानशेतकरी