सोलापूर : जून-जुलै महिन्यात काढलेल्या मजुरांच्या पहिल्या मस्टरचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत तर सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या मस्टरची मागणी केली असताना आतापर्यंत ते काढलेच नाही.
तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची एवढी परवड होत असेल तर तुतीचे लागवड क्षेत्र वाढणार कसे?, असा सवाल शेतकऱ्यांमधून होऊ लागला आहे.
कळमण येथील चार शेतकरी तुतीची लागवड करून मनरेगामधून लागवड, शेड उभारणी व इतर खर्चासाठी पैसे मागणी करीत आहेत. मात्र त्यांच्या खात्यावर काही केल्या पैसे जमा होत नाहीत.
तुतीची लागवड करून एमआरईजीएस (नरेगा) पैसे मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार रोहयो सचिव नंदकुमार यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाला पाठवली आहे.
जिल्हा रेशीम कार्यालय असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मनरेगाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी परेशान झाले आहेत.
जिल्हा रेशीम कार्यालय उत्तर तालुक्यातील हिरज येथे आहे. कोष विक्रीची बाजारपेठ तयार करण्याची तयारी शासनाने केली असली तरी उत्तर सोलापूर तहसील कार्यालय व पंचायत समितीकडून तुतीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना नरेगा योजनेतून पैसे दिले जात नाहीत.
याबाबत अधिक माहिती घेतली असता जून व जुलै महिन्यात कळमण येथील शेतकऱ्यांचे पहिले मस्टर काढण्यात आले. दुसऱ्या मस्टरची मागणी १३ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयाकडे करण्यात आली.
जिल्हा रेशीम कार्यालयाने उत्तर तहसीलला दुसऱ्या मस्टरचे पैसे मजुरांच्या नावावर जमा करण्याबाबत कळविले असले तरी ते मस्टर काढले नसल्याचे सांगण्यात आले.
नागपूर कार्यालयातून चौकशीसाठी तक्रार
१) उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील तुती लागवड केलेल्या पैकी चार शेतकऱ्यांनी मनरेगाचे पैसे मिळत नसल्याची तक्रार केली आहे.
२) जिल्हा रेशीम कार्यालय, उत्तर तहसील व उत्तर पंचायत समितीकडे हेलपाटे मारून वैतागलेल्या शेतकऱ्यांनी राज्याचे रोहयो सचिव नंदकुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. नंदकुमार यांनी ही तक्रार नागपूर येथील रेशीम उपसंचालक कार्यालयाला पाठवली आहे.
३) नागपूर कार्यालयाने जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर यांना चौकशीसाठी ही तक्रार पाठवली आहे.
अधिक वाचा: Solapur Kadak Bhakri : गरिबांच्या ताटातील भाकरी आता श्रीमंताच्या ताटात; कडक भाकरी उद्योग लय भारी