Join us

Thibak Anudan जत तालुक्यात ठिबकचे दोन कोटीचे अनुदान थकले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 4:30 PM

तुषार, ठिबक सिंचन योजना Thibak Sinchan Yojana अनुदान केंद्र, तसेच राज्य शासन वितरित करते. मागील तीन वर्षांपासून या योजनेच्या अनुदानाला 'ब्रेक' लागला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सोडत काढलेली नाही.

दरीबडची : केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी 'प्रति थेंब अधिक पीक' घेण्यासाठी तुषार, ठिबक सिंचन योजना राबविण्यात येते. मात्र, दुष्काळी जत तालुक्यातील १ हजार ७९ लाभार्थी शेतकऱ्यांचे २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ मधील तीन वर्षाचे ठिबक संचासाठीचे अनुदान मिळालेले नाही.

२ कोटी ३० लाख रुपये अनुदान थकले आहे. शासन थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदानावर ठिबक, तुषार संच पुरविण्यात येतात. 'महा डीबीटी'च्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोडत लॉटरी पद्धतीने निवड केली जाते.

अनुदान केंद्र, तसेच राज्य शासन वितरित करते. मागील तीन वर्षांपासून या योजनेच्या अनुदानाला 'ब्रेक' लागला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सोडत काढलेली नाही. त्यामुळे या योजनेबाबत शेतकरी वर्गात संभ्रमावस्था आहे.

महाडीबीटीच्या माध्यमातून नवीन ठिबक संच जोडणीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरले जात आहेत. मात्र, शासनाकडून लाभार्थीना या योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना देणारा शासन अध्यादेश अद्याप निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये योजनेबाबत संभ्रमावस्था आहे.

जत तालुक्यातील १०७९ शेतकऱ्यांना २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षाचे ठिबक संचाचे अनुदान मिळालेले नाही. या 'हेड'ला निधी उपलब्ध नसल्याने अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. मात्र, यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. लवकरच शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध होईल. - प्रदीप कदम, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :ठिबक सिंचनसरकारराज्य सरकारसरकारी योजनाकेंद्र सरकारशेतकरीशेती