आठवड्याच्या शेवटचा दिवस असलेल्या शनिवारी उदगीरच्या बाजारात शेतमालाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. तूर १ हजार, हरभरा ६०० तर सोयाबीनच्या दरात २०० रुपये प्रतिक्विंटलची वाढ झाली आहे. तुरीचा हंगाम संपत आल्याने व मागणी वाढल्याने तुरीच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मागील पंधरवड्यात हरभऱ्याच्या दरामध्ये कमालीची घसरण दिसून आली होती. बाहेर देशातून आयात होणाऱ्या पिवळ्या वाटण्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत हरभऱ्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचे व्यापारी सांगत होते. चांगल्या प्रतीच्या हरभऱ्याचा दर ५ हजार ६०० रुपयेपर्यंत तर सोयाबीनचे दर मागील तीन महिन्यांपासून ४ हजार ४०० ते ४ हजार ४५० च्या आसपास स्थिरावले होते. तुरीला १० हजार ७०० प्रतिक्विंटलचा भाव मिळत होता. परंतु या आठवड्यात बाजारातील सर्वच शेतमालाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी रब्बी व खरीप हंगामातील सर्वच शेतमालाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती कमी प्रमाणात आलेले आहे.
उत्पादन कमी झाली असल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची आशा होती. परंतु बाजारात मात्र सर्वच शेतमालाचे दर दिवसेंदिवस घसरत चालले होते. हंगामाच्या सुरुवातीला ५ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल असलेल्या सोयाबीनचा दर ४ हजार ४०० पर्यंत खाली आला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी माल विक्री करण्याच्या ऐवजी घरीच ठेवला होता.
शेतकऱ्याकडे मागील दोन वर्षांचा सोयाबीनचा माल घरीच विक्री विना पडून आहे. यासोबतच रब्बीमधील हरभऱ्याचे पीक कमी प्रमाणात उत्पादन झाले होते. सुरुवातीला ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत असलेला हरभरा मागील काही दिवसांपूर्वी ५ हजार ६०० पर्यंत खाली आलेला होता हरभऱ्याचे दर वाढू नये, ग्राहकांना कमी दरामध्ये डाळ उपलब्ध व्हावी यासाठी बाहेर देशातून पिवळ्या वाटाण्याची मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आली होती. त्यामुळे हरभऱ्याचे दर घसरून ५६०० पर्यंत खाली आले होते.
पुरवठ्यात तफावत असल्याने वाढ
या सोबतच केंद्र सरकारच्या वतीने अनेक ठिकाणी भारत डाळ या नावाने डाळ विक्री केंद्र शासनाकडून सुरु करण्यात आले आहे. यामुळे हरभऱ्याच्या दरात कमालीची घसरण झाली होती. परंतु मागणी व पुरवठ्यामधील तफावत पाहता चालू आठवड्यात सर्वच शेतमालाचे दर कमी अधिक प्रमाणात वाढलेले आहेत. तुरीचे उत्पादन कमालीचे घटल्यामुळे व बाहेर देशातून कमी प्रमाणात तूर उपलब्ध होत असल्याने तुरीचे दर प्रतिक्चिटल १ हजार रुपयांनी वाढलेले आहेत. त्यामुळे हेच दर आगामी काळात कायम राहिल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र, यात घसरण झाल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
चालू आठवड्यात सहाशे रुपयांची वाढ
सततच्या दर घसरणीमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सोयाबीनला मिळणारा सध्याचा दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेच्या तुलनेत अतिशय कमी आहे. त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्याकडील माल गरजेप्रमाणे आणून बाजारात विक्री करत आहेत. सध्या तुरीच्या दरात चांगली वाढ झालेली आहे, परंतु तुरीचे पीक मोजक्याच शेतकऱ्यांच्या हाती लागलेले आहे. हरभऱ्याच्या दरामध्ये चालू आठवड्यात ६०० रुपये प्रति क्विंटलची वाढ झालेली आहे. सोयाबीनच्या दरामध्ये २०० रुपये वाढ झालेली आहे. यामध्ये आणखी दरवाढीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत असल्याचे बाबुराव मलकापुरे यांनी सांगितले.