Join us

Rahuri Agricultural University : राहुरी कृषी विद्यापीठात एकाच दालनात दोन कुलसचिव.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:06 PM

Rahuri Agricultural University : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कुलसचिवांची प्रतिनियुक्ती शासनाने रद्द करताच कुलसचिवांचे दालन सील करुन नवीन कुलसचिवांनी एकतर्फी पदभार घेतल्याचा प्रकार घडला आहे.

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कुलसचिवांची प्रतिनियुक्ती शासनाने रद्द करताच कुलसचिवांचे दालन सील करुन नवीन कुलसचिवांनी एकतर्फी पदभार घेतल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे एकाच दालनात दोन कुलसचिव अशी विचित्र व अभूतपूर्व परिस्थिती उ‌द्भवली आहे.

महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असलेले अरुण आनंदकर हे विद्यापीठात प्रतिनियुक्तीवर कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने गत १३ मार्च रोजी त्यांची ही नियुक्ती केली.

मात्र याच विभागाने गत ८ ऑक्टोबरला ही प्रतिनियुक्ती रद्द करुन त्यांची सेवा मूळ प्रशासकीय विभागात वर्ग करण्याचा आदेश काढला. हा आदेश कार्यालयीन वेळेनंतर निघाला.

मात्र, विद्यापीठात तत्पूर्वीच कुलसचिवांचे दालन सील करण्यात आले. कुलगुरु प्रशांतकुमार पाटील यांनी त्याच सायंकाळी आनंदकर यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश काढला व या पदाचा अतिरिक्त पदभार सहयोगी प्राध्यापक डॉ. मुकुंद शिंदे यांनी घ्यावा असे म्हटले.

आनंदकर यांनी आपला पदभार शिंदे यांचेकडे हस्तांतरीत करावा व तसे अवगत करावे असे कुलगुरुंनी आदेशात म्हटले होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे दालन सील करण्यात आले अशी माहिती आहे.

दरम्यान, आपल्या कार्यमुक्तीच्या शासनाच्या आदेशाला आनंदकर यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे.

अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यापूर्वी त्यांना तीन महिने नोटीस देणे आवश्यक असल्याची नियमात तरतूद आहे. अशी नोटीस आनंदकर यांना दिली गेली नव्हती.

त्यामुळे न्यायाधिकरणाने गत शुक्रवारी आनंदकर यांच्या कार्यमुक्तीच्या आदेशाला स्थगिती देत 'जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला. याप्रकरणात संबंधित विभागाला नोटीसही बजावण्यात आली आहे.

न्यायाधिकरणाच्या आदेशामुळे आनंदकर यांनी सोमवारी सकाळी आपल्या दालनात येत कामकाज सुरु केले. दरम्यान, तोवर शिंदे यांनीही याच दालनात बसून कामकाज सुरु केले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आनंदकर यांनी शिंदे यांच्याकडे पदभार सोपविलेला नसताना त्यांनी एकतर्फी कामकाज सुरु केले. सोमवारी दुपारनंतर शिंदे दालनाला कुलूप लावून निघून गेले. यामुळे पेच निर्माण झाला आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील हे दुपारनंतर कार्यालयात नव्हते. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. त्यांचा भ्रमणध्वनीही बंद होता. रात्री त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला. पण रात्रीही प्रतिसाद मिळाला नाही.

आनंदकर यांची कार्यमुक्ती रद्द का?- विद्यापीठात भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत. आनंदकर यांनी कामकाज करताना भ्रष्टाचाराच्या काही प्रकरणांवर बोट ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे.- विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापकांच्या वेतनश्रेणीबाबत बनावट शासन आदेश काढून लाभ देण्याचे चुकीचे प्रकार घडले आहेत.- अशाच पद्धतीने राहुरी विद्यापीठातील २१ प्राध्यापकांना लाभ देण्यासाठी आनंदकर यांचेवर दबाव होता. मात्र, त्यांनी यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा आदेश निघाला अशी चर्चा आहे.

शासनाने आनंदकर यांना कार्यमुक्त केले आहे. मॅटकडून मला कुठलाही आदेश आलेला नाही. असा एकतर्फी निकाल मॅट देऊ शकत नाही. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतरच काय तो निर्णय होईल. - डॉ. मुकुंद शिंदे (एकतर्फी पदभार घेतलेले कुलसचिव)

कायदेशीरपणे मी कुलसचिव पदाचा पदभार कोणाकडेही हस्तांतरित केलेला नाही. - अरुण आनंदकर, कुलसचिव

टॅग्स :विद्यापीठसरकारराज्य सरकारशेती क्षेत्रराहुरीराहुरीमहसूल विभाग