राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यांत दहा मॉल तयार करणार. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात 'उमेद मॉल' (Umed Mall) तयार करणार आहोत.
राज्यात आगामी कालावधीत एक कोटी 'लखपती दीदी' (lakhpati didi) करण्याचा संकल्प आहे. सध्या राज्यात १८ लाख 'लखपती दीदी' असून, मार्चपर्यंत त्यांची संख्या पंचवीस लाख करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केली.
बांद्रा-कुर्ला संकुल येथे ग्रामविकास विभागाच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मंगळवारी (११ फेब्रुवारी) रोजी ते बोलत होते.
यावेळी ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, 'उमेद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर, मुख्य परिचालन अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यासह राज्यभरातून बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. हे प्रदर्शन २३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, 'उमेद' (Umed) अभियानाच्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे. 'उमेद'च्या माध्यमातून महालक्ष्मी सरस हा गेली २१ वर्षे अविरत सुरू असलेला महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे. 'उमेद'च्या माध्यमातून ६० लाखांपेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत.
शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी (Women Empowerment) लेक लाडकी, लाडकी बहीण योजना, एस. टी. मध्ये प्रवास सवलत यासह अनेक योजना आणल्या आहेत. लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
“महालक्ष्मी सरस हा गेली २१ वर्ष अविरत सुरू असलेला उपक्रम आहे. ‘उमेद’ अभियानाच्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे. जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारणार. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. प्राथमिक स्तरावर दहा जिल्ह्यांत ‘उमेद मॉल’ उभारण्यात येतील. बचत गटांमार्फत तयार केलेली वस्तू ही खासगी कंपनीच्या मालापेक्षा अत्यंत उत्कृष्ट दर्जाची असून ती अत्यंत माफक दरात उपलब्ध होतात.
महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बचत गटांच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासन आग्रही आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित माल विक्रीचे हमखास ठिकाण मिळावे यासाठी जिल्ह्याच्या महत्वाच्या ठिकाणी मॉल उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे बचतगटातील महिलांना आता हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update: मंगळवारचा अख्खा दिवस गेला मुदतवाढीच्या चर्चेत; मुदतवाढ मिळाली की नाही वाचा सविस्तर