महेश घोलप
शेतीमालाचे भाव घसरल्याने जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल सोयाबीन सध्या घरात पडून आहे. भावाची घसरणच सुरू असल्याने शेतकऱ्यांना हा सोयाबीन विकता येईना त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
सोयाबीन दरात उसळी येऊन हातात अधिक पैसे पडतील, या आशेवर शेतकरी असताना दरात घसरणीला सुरुवात झाली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना गरज असूनही हा माल विकता येत नसल्याचे चित्र आहे. माळशेज परिसरात खरीप हंगामात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली होती.
माळशेज परिसरातील बहुतांश शेतकरी आता सोयाबीन या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहू लागला आहे. सुरुवातीला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ५०० च्या दरम्यान असलेले सोयाबीनचे दर सध्या ४ हजार ते ४ हजार पाचशेच्या दरम्यान येऊन ठेपले आहेत. यामुळे साठवून ठेवलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
सोयाबीन लागवडीचा खर्चही निघेना
■ शेतकरी हतबल असून आणखी दर कोसळणार दरवर्षी या ना त्या संकटाने शेतकरी हैराण असतो. कधी नैसर्गिक संकट तर कधी भरपूर पिकले तर भाव नाही. मग यातून शेतीसाठी केलेला अनेकदा खर्च निघत नाही, अशा अवस्थेत शेतकरी हतबल होत असतो.
■ यंदा तर सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या भाववाढीची आशा धूसर झाल्यामुळे सोयाबीनला पाहिजे तसा भाव मिळत नाही, यामुळे शेतकरी अवघ्या चार ते साडेचार हजार रुपये क्विंटलने सोयाबीन विकतो आहे.
वास्तविक पाहता सात ते आठ हजारांपर्यंत भावाची अपेक्षा होती; मात्र अवघ्या निम्म्या दरात विकण्याची वेळ माळशेज परिसरातील शेतकऱ्यांवर सरकारने आणली आहे. अशा आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होताना दिसत आहे.
■ ऊस, कांदा इतर महत्त्वाच्या पिकांपेक्षा सोयाबीन हे शेतकऱ्यांचे मुख्य व चांगला पैसा देणारे पीक झाले आहे. या पिकावरच खरं आर्थिक गणित जुळत असते. यामुळे सोयाबीन पेरणीवर शेतकऱ्यांचा अधिक कल असतो. बरे त्यातच यंदा कमी पाऊस झाल्याने उत्पन्नात घट झाली.
किती दिवस घरात ठेवायचे?
सोयाबीनचे भाव वाढत नसल्यामुळे आता सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. आजरोजी बाजारात अत्यंत कमी म्हणजे अवघे ४ ते साडेचार हजारांपर्यंत भाव मिळत आहे. यामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेल्या मालास भाव येत नसल्याने शेतकरी आता हतबल झाला आहे.
पहिल्यापेक्षा सोयाबीन दर तब्बल ७०० रुपयांनी घसरल्याने शेतकरी वर्गाची घाबरगुंडी उडाली आहे. दर वाढतील या अपेक्षेने अनेकांनी सोयाबीनचा साठा केला आहे; पण दर घसरल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. विशेष म्हणजे सोयाबीन उत्पादनासाठी लागणारा खर्च वाढत असताना दर कमी होत असल्याने शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर येत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी दर वाढतील, या आशेने सोयाबीन साठवून ठेवला; मात्र उत्पादकांचीही निराशाच झाली. सध्या दर हे चार ते साडेचार हजार दरम्यान खाली घसरले. विकावं तर भाव नाही, घरात ठेवावं तर हाती पैसा नाही अशी अवस्था सर्वत्र झाली आहे. - संतोष ज्ञानेश्वर डुंबरे, शेतकरी