राजाराम लोंढेकोल्हापूर : सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पादन फारच कमी असल्याने परवडत नाही. त्यात जमिनीची ताकद पिकांनी खाऊन खाऊन संपल्याने रासायनिक खतांचा वापर केल्याशिवाय उत्पादन मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
त्यातून रासायनिक खतांचा वापर वाढला; पण त्याचे जमिनीतील अतिरिक्त अवशेष नष्ट कसे केले जातात हेच शेतकऱ्यांना माहिती नसून केवळ रासायनिक खते वापरूच नका, हा सल्ला देण्यापेक्षा कृषी विभाग व कृषी विद्यापीठाने याबाबतचे मार्गदर्शन केले पाहिजे.
मध्यंतरी सेंद्रिय शेतीसाठी सरकार आग्रही राहिले होते. अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली, पण त्यात ते आतबट्यात आले. अपेक्षित उत्पादन मिळत नाही आणि त्याला जादा दर देण्याची मानसिकताही कोणाची नाही. त्यात सगळीकडेच उत्पादन वाढीची स्पर्धा आहे.
उत्पादन जादा पाहिजे तर रासायनिक खते, तणनाशक, कीटकनाशकांचा वापर करावाच लागतो. त्याच्या वापरामुळे जमिनीत वाढणाऱ्या अतिरिक्त अवशेष नष्ट करण्याचे तंत्र शेतकऱ्यांनी अवगत केले पाहिजे. त्यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
टाकलेल्या खतांपैकी २० टक्केच पिकालारासायनिक खतांचा अतिरिक्त वापर होतोय, हे खरेच आहे. जमिनीत टाकलेल्या एकूण खतांपैकी केवळ २० टक्के खत पिकांना मिळते. उर्वरित खत वाया जाते.
खतांचा जादा वापर किडीला निमंत्रणगरज नसताना अधिक खते दिल्याने पिकांच्या पानात नत्राचे प्रमाण वाढते. नत्रामुळे पाने हिरवेगार होऊन किडीचा प्रादुर्भाव वाडला जातो.
दोन वर्षांतील रासायनिक खतांचा वापर (टनामध्ये)
खताचा प्रकार | २०२२-२३ | २०२३-२४ |
युरिया | ४७,०३० | ५०,४६८ |
एमओपी | ९,१७६ | ११,०५६ |
एसएसपी | १२,५५७ | ८,६१७ |
डीएपी | १५,९४२ | ११,९७९ |
संयुक्त खते | ४०,५७६ | ५०,१६५ |
एकूण | १,२५,२८१ | १,३२,२८५ |
काय आहे विनानांगरट शेती? एक पीक काढल्यानंतर नांगरटी न करता टोकन अथवा बैलांच्या साहाय्याने पेरणी करायची. यामुळे पहिल्या पिकाचा जमिनीखालील भाग कुजतो. कुजण्याच्या प्रक्रियेतून नवीन उपपदार्थ तवार होतात, ते खतांचे अवशेष नष्ट करतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे रासायनिक खतांचा जमिनीतील अवशेष नष्ट करता येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सेंद्रिय शेतीतून उत्पादन कमी आणि अपेक्षित दर मिळत नाही. जादा उत्पादन हवे असेल तर रासायनिक खते वापरावे लागतील. खतांचा जमिनीतील अतिरिक्त अवशेष नष्ट करण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांनी अवलंबली पाहिजे. - प्रतापराव चिपळूणकर (शेती तज्ज्ञ)
अधिक वाचा: Neem Ark शेतकऱ्यांनो आताच करा निंबोळ्या गोळा, निंबोळी अर्कासाठी होईल याचा फायदा