Join us

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत बाराशे हेक्टरवर फुलणार विविध फळांच्या फळबागा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 9:47 AM

फळपीक विमा योजनेत पाच फळपिकांचा समावेश

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात यावर्षी विविध फळांच्या फळबागा फुलणार असून, याकरिता शासनाकडून भरीव अनुदान उपलब्ध केले जाणार आहे. अकोला जिल्ह्याला यावर्षी १२०० हेक्टरचे उद्दिष्ट यासाठी देण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यात यावर्षी फळबागा लावण्यासाठी कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येत असून, त्यासाठी भरीव अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. फळबागा लागवडीच्या कामासाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे.

अनुदान लाभार्थ्यांना तीन वर्षांच्या कालावधीत प्रथम पन्नास टक्के व दोन टप्प्यात तीस, तीस टक्के या प्रमाणात रक्कम दिली जाणार आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली.

दरम्यान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत जिल्ह्याला २१०.७४ लक्ष रुपये देण्यात आले असून, या योजनेत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी भरीव अनुदान देण्यात येणार आहे. दोन्ही योजनेत शेतकऱ्यांना उत्तम फळबागा फुलविता येणार आहेत.

फळे, फुले, फलोत्पादनासाठी अनुदान

• आंबा, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिकू, सीताफळ, पेरू, डाळिंब, आवळा, चिंच, बोर, जांभूळ, कवठ, फणस, कोकम, ड्रॅगनफ्रूट, अॅव्हॅकेडो, केळी या फळांचा समावेश आहे.

• फुलांमध्ये निशिगंध, मोगरा, गुलाब, सोनचाफा तसेच फलोत्पादनामध्ये बांबू, शेवगा, साग व शिंदीचा २ समावेश करण्यात आला असून, लागवडीकरिता अनुदान उपलब्ध केले जाणार आहे. यामध्ये औषधी वनस्पतींचादेखील समावेश आहे.

जिल्ह्यातील पाच फळपिकांना विमा कवच

अकोला जिल्ह्यात यंदा मृग बहार कालावधीत संत्रा, लिंबू, पेरु, डाळिंब व मोसंबी या फळपिकांसाठी पुनरीचत हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली. अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या योजनेत सहभागी व्हावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती झाली आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे शेतकरी व कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. संत्रा व मोसंबी या दोन फळपिकांसाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी एक लक्ष व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीकविमा हप्ता ५ हजार रुपये आहे. मोसंबीसाठी पातूर तालुक्यातील पातूर महसूल मंडळ अधिसूचित आहे.

डाळिंबासाठी आठ तर पेरूसाठी ३,५०० रुपये हप्ता

• डाळिंब पिकासाठी अकोला तालुक्यातील शिवणी हे महसूल मंडळ अधिसूचित असून, विमा संरक्षित रक्कम है. एक लक्ष ६० हजार व हप्ता आठ हजार रुपये आहे. तर पेरू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ७० हजार रुपये असून, हप्ता ३ हजार ५०० रुपये आहे, पेरूसाठी पातूर तालुक्यातील पातूर महसूल मंडळ अधिसूचित आहे.

• योजनेची माहिती उपविभागीय, तसेच तालुका कृषी कार्यालये, कृषी विभाग व विमा प्रतिनिधींशी संपर्क साधावा व विमा योजनेत सहभागी होऊन फळपीक संरक्षित करावे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली.

या तालुक्यांचा समावेश

• संत्रा : पिकासाठी बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा व पातूर या तालुक्यांतील राजंदा, धाबा, बार्शीटाकळी, पिंजर, महान, खेर्डा, निम्भा, कुरूम, हातगाव, अकोलखेड, उमरा, पणज, अकोट, अडगाव बु., हिवरखेड, माळेगाव बाजार, तेल्हारा, पातूर, आलेगाव आदी मंडळांचा समावेश आहे.

• लिंबू : पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हे. ८० हजार व विमा हप्ता चार हजार रुपये आहे. अधिसूचित क्षेत्रात अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, पातूर व बाळापूर या तालुक्यांतील शिवणी, सांगळूद, बोरगावमंजू, कौलखेड, कापशी रोड, राजंदा, धाबा, महान, खेर्डा बु.. बार्शीटाकळी, पिंजर, निबा, जामठी बु., कुरूम, मूर्तिजापूर, हातगाव, अकोलखेड, आसेगाव बाजार, उमरा, पणज, मुंडगाव, अकोट, अडगाव बु., हिवरखेड, माळेगाव बाजार, पातूर, बाभूळगाव, आलेगाव, सस्ती, चान्नी, वाडेगाव, बाळापूर, व्याळा आदी महसूल मंडळांचा समावेश आहे.

हेही वाचा - आता यंत्राने काढता येईल असे हरभरा वाण विकसित; उत्पादन देखील अधिक

टॅग्स :अकोलाफळेशेतकरीशेतीविदर्भशेती क्षेत्रसरकारी योजना