अन्नदाता, महिला आणि गरीब यांना मध्यवर्ती स्थानी ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यातील महत्त्वाची बात होती हवामान बदल आणि त्याचे शेतीवर होणारे परिणाम.
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी ३२ पिकांसाठी १०९ वाणांची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी कृषी संशोधनावर भर देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. आगामी काळात या निर्णयाचा शेती आणि शेतकऱ्यांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
हवामान बदल याचा दूरगामी परिणाम आपल्या शेतीवर होताना दिसतो आहे. मागील काही वर्षात पाहिलं तर नेमका पिक काढणीस तयार असताना येणारा पाऊस आणि होणारे नुकसान सातत्याने दिसत आहे. हे हवामान बदलाचे चक्र असंच राहणार आहे. आपल्याला आता हवामान बदल आधारित शेती करावी लागणार आहे.
आजची शेती खूप धकाधकीची झाली आहे. पेरावं कधी काढावं कधी याच्यातील सुसूत्रपणा दिसत नाही. पाणी, माती आणि पशुधन या घटकांना केंद्रित ठेवून केली जाणारी शाश्वत शेती आता आपल्या अधिकच्या उत्पादनासाठी एक पिक पद्धती, अधिकच्या निविष्ठा आणि अधिकचे पाणी यांचा भार सोसते आहे. पिक पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे. हमखास उत्पन्न देणारे ऊस पिकाखालील क्षेत्र वाढते आहे.
हलक्या मगदूरच्या जमिनीही ऊस पिकाखाली येत आहेत. हमखास उत्पन्न मिळण्याच्या खात्रीमुळे एक पिक पद्धती वाढताना दिसते आहे. यात अधिकच्या उत्पन्नापोटी यात मातीचं आरोग्य पाहायला हवं. त्या मातीचा आपल्या पूर्वजांनी कसा सांभाळ केळा आणि आपण कसा करतो आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला तो कोणत्या स्वरुपात देणार आहोत याकडे बारकाईने पाहणं आवश्यक वाटते.
वाढत्या लोकसंख्येमुळे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतजमिनीचे तुकडे पडत असून जमिनीच्या छोट्या तुकड्यावर फायद्याची शेती करणे शेतकऱ्याला अशक्यप्राय होत आहे. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती आणि एकत्रित शेती अशी परंपरा होती. काळानुरुप ती बदलली आता विभक्त कुटुंब पद्धती त्या कुटुंबाबरोबर शेतजमिनीचेहि तुकडे होत आहेत. प्रती शेतकरी शेतजमीन (अन्नधान्य मिळण्यायोग्य) धारणा कमी होताना दिसत आहे.
हवामान बदल आधारित शेती आणि तंत्रज्ञान यात संरक्षित शेती, काटेकोर शेती यांचा अबलंब होताना दिसतो आहे पण आज अल्प भूधारकांना हे सर्व आजमावणे कठीण आहे. कधी लांबणीवर पडणारा मान्सून, अतिवृष्टी, गारपीठ पिक भरण्याच्या काळात पावसाचा खंड ह्या घटकांचा परिणाम शेतीवर तसेच शेतकऱ्यांच्या मनावर खोलपणे होताना दिसतो आहे.
काही ठिकाणी उशिरा पावसामुळे उशिरा पेरणी पिक काढणीला आल्यावर अतिवृष्टी. शेतातील पाण्याचा निचरा आणि खरीप उशिरा म्हणून रब्बी पण उशिरा यात संरक्षित पाण्याच्या सुविधेचा आभाव हे चक्र दिवसेंदिवस बदलत चालल आहे.
आपल्याला या बदलाबरोबर आपल्या शेतीत बदल करावे लागणार आहेत. जसे पाण्याचा ताण सहन करणारे वाण आहेत तसे अति पाणी सहन करणारे वाण विकसित करावे लागतील. हवामान बदल याला संवेदनशील पिकांचे वाण तसेच अजैविक ताण याचा विचार करून पिकांच्या जाती/वाण निर्माण करणे जरुरीचे आहे.