Union Budget 2024 : "यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी एक लाख ५२ हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद शेती आणि संलग्न क्षेत्रासाठी आहे. पण नुसत्या शेतीसाठी नाही. वास्तविता पाहता देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा १८.२% वाटा आहे . यंदाचा कृषी विकासदर १.४ टक्क्यांपर्यंत खाली आहे. शासन गेल्या कित्येक वर्षापासून डब्लिंग इन्कमची परत परत घोषणा करत आहे, त्यासाठी ही तरतूद योग्य आहे का हाच मोठा प्रश्न आहे."
"नैसर्गिक शेतीसाठी एक कोटी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. त्याबरोबरच ट्रॅडिशनल शेतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आवश्यक आहे. डाळी व तेल बिया उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार हे मात्र उत्साहवर्धक आहे. उत्पादक ते ग्राहक साखळी ही मजबूत आणि कमी कड्या असलेली करणार, शेतीसाठी विविध योजनांचे नियोजन, सोयाबीन सूर्यफूल बियाण्याच्या साठवणुकीसाठी प्रयत्न या गोष्टी उत्साहवर्धक आहेत."
"मात्र ३२ फळे आणि १०९ भाजीपाल्याच्या नवीन जाती विकसित करण्याचीही घोषणा केली पण हे समजलं नाही, कारण हे संशोधन चालूच आहे. यासाठी विशेष प्रयत्न करणार असं असायला हवं होतं. वास्तविकतः अर्थसंकल्पात डब्लिंग इन्कम करायचे आणि शेती अर्थव्यवस्था मजबूत करायची तर शेतीसाठी आधुनिक सिंचन प्रणाली, मोठ्या प्रमाणात निर्यात वाढीसाठी प्रयत्न तसेच कृषी संशोधनासाठी विशेष तरतूद अर्थसंकल्पात अपेक्षित होती, ती झाल्याचे दिसत नाही. एकूणच अर्थसंकल्प हा सर्वसाधारण ठीक परंतु फारसा शेतीसाठी उत्साहवर्धक दिसत नाही."
- डॉ. भगवानराव कापसे (फळबागतज्ञ तथा गटशेती प्रणेते)