युनूस नदाफ
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील पार्टी म. येथील शेतकऱ्याच्या शेतातील २०० केळीची झाडे अज्ञात व्यक्तीने कापून टाकली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार १६ एप्रिल रोजी घडला असून, याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्डी येथील शेतकरी दादाराव वैद्य यांची दोन एकर शेती पार्टी गावातील शेतकरी राजकुमार देशमुख यांनी वाट्याने केली आहे. यामध्ये त्यांनी मागील वर्षी ३ हजार ३०० केळीच्या रोपांची लागवड केली होती. पुढील काही दिवसांत केळीच्या घडाची काढणी सुरू होणार होती ज्यातून चांगले उत्पन्न त्यांना मिळणार होते.
मात्र, या मेहनतीवर अज्ञात व्यक्तीने अक्षरशः पाणी फेरले. रात्रीच्या सुमारास या अज्ञात व्यक्तीने बागेतील २०० झाडे कोयत्याने कापून टाकली. इतक्यावरच न थांबता, बागेतून पाणीपुरवठा करणारी पाइपलाइनदेखील तोडली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान तर झालेच, परंतु शेतकऱ्यांचे मानसिक खच्चीकरणही झाले आहे.
गंभीर बाब म्हणजे, दोन वर्षांपूर्वीही याच भागातील शेणी शिवारात अशा स्वरूपाचा प्रकार घडला होता. त्यावेळीही हजारो केळीच्या झाडांची नासधूस करण्यात आली होती. त्या प्रकरणातही अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही काळ हा प्रकार थांबला होता. मात्र, पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा : शेतकरी बांधवांनो 'हे' सोपे उपाय येतील कामी; हृदयाविकाराची सुटेल चिंता सारी