उजनी धरण ७० टक्के भरल्याशिवाय शेतीसाठीपाणी सोडले जाणार नाही. दौंडवरून उजणीत सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आल्याचे लाभक्षेत्र विकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मागील वर्षी १५ ऑगस्ट रोजी धरण शंभर टक्के भरले होते. मात्र यंदा उजनी धरणात केवळ १३ टक्केच पाणीसाठा जमा आहे.
उजनी धरणासह शेतीसाठी महत्त्वाची असणारी नीरा नदी आणि त्यावरील बंधारे कोरडेठाक पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्यात बहुतांश भागात सध्या पावसाने चांगलीच ओढ दिल्याने आधीच शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात शेतीसाठी पाणी सोडण्यात आले नाही तर पिके जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
उजनी धरणातून सोलापूर, धाराशिव, जामखेड, कर्जत, करमाळा, इंदापूर, बारामती, बार्शीसह इतर नगरपालिकांना आणि जिल्ह्यातील छोट्या गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा पावसाचा अंदाज येत नसल्यामुळे उजळणी धरण ६० ते ७० टक्के भरल्याशिवाय धरणातील पाणी शेतीसाठी सोडले जाणार नाही, असे नियोजन करण्यात येत आहे.
मागील वर्षी १५ ऑगस्टच्या आधीच उजनी धरण १०० टक्के भरले होते. ऐन पावसाला संपत आला तरी यंदा धरणात पाणीसाठा शिल्लक नसल्याने येणाऱ्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील १० ते १५ दिवसात सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडला नाही तर शहरासाठी पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे शेतीसाठी तुर्तास पाणी सोडले जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.