बापू नवलेकेडगाव: दौंड तालुक्यात एकूण ६५०० हेक्टरहून अधिक कांदा लागवड झालेली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाल्याने सध्या कांदा काढणी शेतामध्ये जोमात सुरू आहे.
जोराचा वारा सुटल्याने व थोडाफार पाऊस पडल्यामुळे कांद्याच्या पाथीने मान टाकली आहे. त्यामुळे शेतकरी कांदा काढण्याचे घाई करत आहे.
गेल्या चार-पाच दिवसांमध्ये हवामानात बदल झाला. पावसाचे वातावरण दिसू लागले. जोरदार वारा सुटत होता. कांद्याच्या उभ्या पातीने मान टाकली आहे. हा कांदा कुजण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन कांदा काढण्याच्या मागे लागले.
शेतात कांदा काढण्यासाठी मजूर मिळेना. जे मजूर मिळतात त्यांनी एकरी उक्ते पद्धतीने एकरी सरासरी १० हजार रुपये ते १३ हजार रुपये इतकी मागणी करत आहेत. वास्तविक पाहता कांद्याला काय बाजार भाव मिळेल हे शेतकऱ्याला माहीत नाही.
कांदा लागवडीच्या वेळेस कांदा लावण्यासाठी मजुरांचा खूप मोठा वांदा झाला होता. रोप मिळवणे, खुरपणी, पाणी आणि आता कांदा काढणे. या सर्वच गोष्टींसाठी शेतकऱ्यांना कांद्यासाठी खूपच कसरत करावी लागले आहे.
एकूणच हा कांदा काढल्यानंतर बाजार भाव पाहता कांदा विक्रीस नेणे शक्य वाटत नाही. मग हा कांदा साठवून ठेवण्यासाठी कांदा चाळीचा आसरा शेतकऱ्यांना आता घ्यावा लागणार आहे.
सध्या मजुरांची संख्या कमी झालेली दिसते. शेतकऱ्यांना या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. कमी क्षेत्र लागवड केलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. मोठे शेतकरी बाहेरून मजूर मागवत आहेत. त्याच प्रमाणात मजुरीच्या दरात देखील वाढ झालेली आहे. - वैजनाथ गायकवाड, शेतकरी केडगाव, दौंड
स्थानिक मजूर मिळेनात, बाहेरून मजूर मागवावे लागत आहे. त्यांना खाण्यापिण्याचा खर्च करावा लागत आहे. कांदा पिकाची सध्याचे खर्च पाहता दर वाढण्याची वाट पहावी लागणार आहे. - मंगेश नातू, पिंपळगाव
हवामान बदलामुळे कांद्याने मान टाकली आहे. उभ्या कांद्याला सध्या तापमान वाढल्यामुळे करपा रोगाचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी कांदा काढण्याला प्राधान्य देत आहे. - राहुल माने, तालुका कृषी अधिकारी दौंड
अधिक वाचा: साठवणुकीत कांद्याला मोड येऊ नये म्हणून करा हा सोपा उपाय? वाचा सविस्तर