हिंगोली जिल्हातील जवळाबाजार परिसरात मागच्या पंधरा दिवसांपासून अधूनमधून वळवाचा पाऊस व वादळवारे सुटत आहेत. त्यामुळे तर शेतकऱ्यांच्या हळदीचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खरीप हंगामामध्ये कापूस, तूर व इतर पिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही. त्यातच आता हळदीचेही नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना एक ना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या वर्षी हळदपीक चांगले साथ देईल, या आशेने शेतकऱ्यांनी जोपासना केली व ते वाढविले; परंतु ऐन हळद काढणीच्या काळामध्येच वळवाच्या पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिपात जसे थोडेबहुत नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना दिले, त्याप्रमाणे हळदीच्या नुकसानीचे अनुदान शासनाने शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
जवळाबाजार, पूरजळ, रांजाळा कोंडशी, आजरसोंडा, नालेगाव, टाकळगव्हाण, करंजाळा, कळंबा, बोरी, तपोवन, आदी भागांत मोठ्या प्रमाणात हळदकाढणी सुरू आहे. मात्र गत १५ दिवसांपासून दररोज वळवाचा पाऊस हजेरी लावत आहे. दिवसभर कडक ऊन व नंतर उकाडा जाणवून दुपारी चार वाजल्यानंतर परिसरात दररोजच वादळीवारे व वळवाचा पाऊस येऊ लागला आहे.
हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?
कोणतेही पीक घेतले तरी त्यामध्ये संकटे येऊ लागली आहेत. खरीप हंगामापासून एक ना अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शासनाकडे अनुदानाची मागणी केली, तर तेही वेळेवर मिळत नाही. - मोहन चव्हाण, आडगाव रंजे, शेतकरी
दोन वर्षांपासून शेतीमाल मोंढ्यात नेला तर त्यात त्रुटी काढल्या जात आहेत. योग्य भाव मिळत नाही म्हणून तर शेती करावी की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. - के. जी. राखोडे, आजरसोंडा, शेतकरी
यावर्षी हळदपीक साथ देईल असे वाटले होते; पण अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान आर्थिक झाले. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. - माउली अभोरे, कळंबा, शेतकरी