Join us

दिवसाआड अवकाळी पावसाचा तडाखा, कसा होईल पंचनामा? प्रशासनापुढे पेच कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 12:00 PM

कडक उन्हाळ्यात पावसाळ्याची शेतकरी बांधवांना प्रचीती

बीड जिल्ह्यात मागील १५ दिवसांच्या कालावधीत गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

परंतु अवकाळी पाऊस दिवसाआड पडत असल्याने तलाठी, कृषी कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्यास अडथळा येत आहे. परिणामी, आतापर्यंत अवकाळीमुळे किती नुकसान झाले याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नाही.

बीड जिल्ह्यातील वडवणी, धारूर व अंबाजोगाई तालुक्यात ९ ते १२ एप्रिल या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे १०२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तसेच १४ घरांची अंशतः पडझड झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचनाम्यांना सुरुवात झाली होती. परंतु अवकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढला.

काही भागांत पुन्हा अवकाळीचा दणका बसत आहे. दिवसाआड पाऊस होत असल्याने तलाठी व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करणे अवघड बनले आहे. आज पंचनामा केला की पुन्हा पाऊस होत असल्याने नुकसान नमूद करताना अडचणी येत आहेत.

असा प्रकार सर्वच भागांत नसला तरी काही ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे परिस्थिती पाहून स्थानिक कर्मचारी पंचनामे करीत आहेत. आजही अनेक भागांत अचानक अवकाळी पाऊस होत आहे.

अवकाळीमुळे दिलासा

■ बीड शहरासह जिल्ह्याचे तापमान १७ एप्रिल रोजी ४३.२ अंश नोंदविले गेले होते. त्याचवेळी जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली.

■ अनेक ठिकाणी गारा पडल्या, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

■ हळूहळू तापमानाची तीव्रता कमी झाली. दुपारी कडक ऊन पडत आहे, तर सांयकाळी किंवा रात्रीच्या वेळी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. उन्हाळा व पावसाळा अशा दोन्ही ऋतूंचा अनुभव एकाचवेळी नागरिकांना येत आहे.

गुरुवारी सकाळी झाला पाऊस

बीड शहरात गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. अधिक ऊन पडत असल्याने बाष्पीभवनामुळे पावसाचे पाणी तत्काळ उडून जात आहे. अशी परिस्थिती असली तरी हवेत गारवा निर्माण होत असल्याने उकाड्यापासून वृद्ध व लहान मुलांना मोठा दिलासा मिळत आहे.

हेही वाचा - अलीकडे का झाले अनेक दूध उत्पादकांचे डेअरी फार्म बंद?

टॅग्स :पाऊसवादळशेतीशेतकरीपीक