- रविंद्र शिऊरकर
छत्रपती संभाजीनगर : मागच्या एका आठवड्यात मराठवाड्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस पडला. यामुळे रब्बी पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले तर कोरडवाहू शेतकऱ्यांना मात्र हा पाऊस फायद्याचा ठरला आहे. विहिरीतील जिवीत पाणी साठा संपल्याने आणि उन्हाची दाहकता अधिक असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी पेरण्या केल्या नव्हता. मात्र, आता जमिनीत पूरक ओल निर्माण झाल्याने, सोबत धोधो बरसलेल्या पावसामुळे विहिरीत देखील पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकरी एक ते दोन पाण्यात येणारा हरभरा आणि जनावऱ्यांच्या चाऱ्याच्या हेतूने ज्वारीची लागवड करत आहे.
नाशिक, नगर, पुणे, सोलापूर या पट्ट्यात अवकाळी आणि गारपिटीच्या पावसामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक भाजीपाला पीके वाया गेली आहेत. तर पहिल्या दोन दिवसानंतर झालेल्या पावसामुळे गारपीट झाली नाही, त्यामुळे हा पाऊस काही रब्बीच्या पिकांसाठी फायद्याचा ठरला आहे.
उन्हाळी कांद्यासाठी देखील हा पाऊस फायद्याचा
उन्हाळी कांदा रोपे टाकलेल्या शेतकऱ्यांचे रोपांवर काही अंशी बुरशी आलेली दिसून येत आहे तर काहींचे रोपे पिवळी पडली आहे औषधे फवारणी खर्च वाढला असून सोबत बऱ्याच शेतकऱ्यांना पुन्हा रोपे निमिर्ती करावी लागणार आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा पिकं हाती येईल की नाही ही आशा सोडली असतांना या अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्यांत नवीन ऊर्जा आली असून आता कांदा निघेल अशी अपेक्षा आहे. तसेच दर टिकून राहिले तर या पावसाचा व उन्हाळी कांद्याचा फायदाच होईल असं कांदा उत्पादक शेतकरी बोलतांना दिसून येत आहे.
कमी पाण्यात आणि खर्चात हरभरा पीक येत असल्यामुळे व त्यातून घरची हरभरा डाळ असल्याने तेवढाच किराणा खर्च वाचतो. उत्पन्न चांगले मिळाले तर दोन पैसे देखील मिळतात या हेतूने रिकाम्या असलेल्या दोन एकर शेतात उशीरा कोरवाहू हरभरा लागवड केली आहे.
- सुरेश पवार ( शेतकरी शिऊर)