राज्यात अवकाळी पावसाने शिवारातला कापूस पुरता भिजला. कापूस उत्पादक शेतकऱ्याचा भिजलेला कापूस व्यापारी विकत घेत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. कपाशीचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना भिजलेल्या कापसाचे काय करावे हे कळेनासे झाले आहे. वेचणीला आलेल्या कापूस ऐन हंगामात भिजल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
ढगाळ वातावरणामुळे अंतिम टप्प्यात गुलाबी बोंडअळीचा धोका वाढला आहे. मध्यंतरी अतिवृष्टीच्या दरम्यानही या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झालेला होता. तर आता कापूस वेचणी सुरु असताना निर्माण झालेले चित्र शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पादनासाठी वेचणी न डावलता वेळेत वेचणीचे काम केले तरच कापूस शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.
कापूस उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा, मागील वर्षीचा कापूस घरातच पडून...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने भिजलेल्या कापसाचे तसेच बोंडआळी आणि कपाशीच्या एकूण व्यवस्थापन कसे करावे याविषयी सल्ला दिला आहे.
- वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
- पाऊस झालेल्या ठिकाणी भिजलेल्या कापसाची वेचणी कापूस वाळल्यानंतर करावी व वेचणी केलेला कापूस वेगळा साठवावा.
- मागील आठवडयात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे कापूस पिकात बोंड सड दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
- कापूस पिकात गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 6 मिली किंवा सायपरमेथ्रीन 25 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.