हिंगोली जिल्ह्यात अनेक शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. ईकेवायसी करूनही रक्कम मिळत नाही. तीन तालुक्यात तर एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तीन दिवसांपासून ही साईटच अंडर मेंटनन्स आहे.
अतिवृष्टीचे अनुदान मिळाले की, पेरणीचे साहित्य खरेदी करायचे अशी आशा बाळगून शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. मात्र हे अनुदान मिळायचे नाव नाही. आधी याद्या अपलोड करण्यासाठीच शासन व प्रशासन दोन्हींकडून वेळ लागला. त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यात हे काम ठप्प झाले.
कृषी सहायक व तलाठ्यांपैकी कुणी काम करायचे? यातही बराच काळ गेला. आता १ लाख ६५ हजार शेतकऱ्यांची केवायसी झाली तरीही त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही.
शेतकऱ्यांची वाढती ओरड लक्षात घेता प्रशासन आता अनुदान जमा होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र शासनाचे हे पेमेंट डिसबर्समेंट पोर्टलच अंडर मेंटनन्स असल्याचे मागील चार ते पाच दिवसांपासून पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडे इतर कोणताच पर्याय उरला नाही.
१६७ पैकी ९ कोटीच जमा
■ अडीच लाख शेतकऱ्यांना १६७ कोटी रुपये वितरित करायचे आहेत. आतापर्यंत १ लाख ६५ हजार शेतकऱ्यांच्या ९८ कोटी रुपयांच्या मदतीच्या याद्या अपलोड झाल्या आहेत.
■ यापैकी १२ हजार ६१२ जणांच्या खात्यावर ९ कोटी ४० लाख जमा झाले आहेत. तर ५८ हजार ४०५ शेतकऱ्यांनी ईकेवायसी करूनही त्यांच्या खात्यावर ३२ कोटी ७५ लाख अद्याप जमा झाले नाहीत.
अशी आहे आतापर्यंत स्थिती
■ १ लाख ६५ हजार आतापर्यंत अपलोड शेतकऱ्यांच्या याद्या
■ १२ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा
■ ५८ हजार ४०५ शेतकऱ्यांनी केली ई-केवायसी
हेही वाचा - शेतकऱ्यांनो विद्युत धक्क्यातून जनावरे वाचवायची? मग शेतात काम करतांना अशी काळजी घ्या