Urea Black Market :
अमरावती : अनुदानित युरियाच्या ६२३ बॅगा उद्योगवापरासाठी रिपॅकिंग करताना पकडला गेल्या. युरियाचे ४५ किलोंचे पोते २६६.५० रुपयांना शेतकऱ्यांना मिळते. यामागे किमान दीड हजार रुपयांची सबसिडी खत कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यानंतर हीच बॅग ५० किलोंच्या पॅकिंगमध्ये उद्योगांना २००० रुपयांना विकली जाते.
युरियाचा काळाबाजार करण्यामागे हा डबलगेम असल्याचे उघडकीस आले. पोलिस तपासात खोलवर गेल्यास याचे मोठे कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातून युरियाचे खत आणल्याचे या गुन्ह्यातील संजय अग्रवाल याने प्राथमिक तपासात पोलिसांना सांगितल्याचे कृषी विभागाने सांगितले.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या युरियाची विक्री कोणत्या कृषी केंद्रातून झाली; त्यांनी हे खत कोणत्या शेतकऱ्यांना विकले; त्यासाठी आधार क्रमांक कोणता दिला; शिवाय केंद्रचालकांनी शेतकऱ्यांच्या नावे विक्री केली का, याची चौकशी झाल्यास युरिया विक्रीचे मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.वडगाव माहोरे शिवारातील एका स्टोन क्रशरमध्ये शेतीवापराचा युरिया औद्योगिक वापरासाठी रिपॅकिंग करताना पोलिसांनी छापा टाकला व या कारवाईत युरियाची ६२७ पोती जप्त केली; त्यामुळे अनुदानित युरियाचा काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांना युरिया मिळेना
खरिपात शेतकऱ्यांना युरिया मिळेनासा झाला होता; शिवाय पुरवठा कमी झाला. कंपन्यांद्वारा युरियासोबत लिंकिंग करण्यात आले. त्यामुळे नको असलेले जोडखत शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. अशा परिस्थितीत अडीच हजार क्विंटलचा 'बफर स्टॉक' जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने कृषी विभागाद्वारा खुला करण्यात आला होता.
आर्वी येथे दोन महिन्यांपूर्वी कारवाई
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील येथील संजय अग्रवाल या कृषी विक्रेत्याला घटनास्थळी पोलिसांनी पकडले आहे. यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी आर्वी येथे अशाच प्रकारे शेतीपयोगी युरिया औद्योगिक वापरासाठी विकण्यात आला होता. त्या घटनेची तार वडगाव माहोरे येथील घटनेशी जुळली असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली.
शेतकऱ्यांच्या नावावर गोरखधंदा
युरियाची विक्री ई-पॉस मशीनद्वारे केली जाते. यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, शिवाय त्यांचा थंबदेखील असतो व त्यांच्या मोबाइलवर ओटीपी येतो. एका शेतकऱ्याला एका दिवशी १० बॅगांपर्यंत युरिया मिळतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पुन्हा विकत घेऊ शकतो, या प्रकारात विक्रेत्याने हा गोरखधंदा केल्याची चर्चा होत आहे.