Urea Scam Case:
बीड : शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेले अनुदानित युरिया खत अनाधिकृतपणे औद्योगिक वापरासाठी विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेत युरियाचा खत साठा व इतर साहित्य असा एकूण १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई जिल्हा परिषदेचे खत निरीक्षक, आष्टी पंचायत समितीचे खत निरीक्षक व अंभोरा पोलिस यांनी मंगळवारी संयुक्तरीत्या केली.बीड जिल्हा परिषदेचे खत निरीक्षक तथा मोहीम अधिकारी सयाप्पा गरंडे यांना मंगळवारी सकाळी माहिती मिळाली की, आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे अनधिकृतरीत्या युरिया खताचा साठा असून तो विक्रीच्या उद्देशाने वेगळ्या बॅगमध्ये भरून ठेवला आहे.त्यानुसार खत निरीक्षक गरंडे, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी ए. एल. काळुशे, आष्टी पंचायत समितीचे खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी नितीन राऊत हे अंभोरा पोलिस ठाण्यात दाखल झाले.त्यानंतर, बीड अहमदनगर रोडवरील घाटापिंप्री शिवारात खत निरीक्षक व पोलिस अधिकारी दाखल झाले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आबासाहेब चांगदेव शेळके यास खत साठवणुकीबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना आढळून आला नाही.
शेळके याच्या गोठ्याशेजारी असलेल्या खोलीची पाहणी केली असता त्या ठिकाणी १ लाख १२ हजार रुपये किमतीच्या ५० बॅगा आढळून आल्या. तसेच इतर कंपन्यांच्याही युरिया खताच्या बॅग होत्या.सदरील मुद्देमाल संशयास्पद आढळल्याने त्या ठिकाणी असलेल्या बॅगांमधील युरियाचे नमुने तपासणीसाठी सीलबंद केले. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा परिषदेचे खत निरीक्षक सयाप्पा गरंडे, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी ए. एल. काळुशे, आष्टी पंचायत समितीचे खत निरीक्षक नितीन राऊत यांनी केली.
रिकाम्या बॅगा, शिलाई मशीन आढळली
आबासाहेब शेळके याच्या खोलीमध्ये युरिया आढळल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रिपॅकिंग केलेल्या बॅगबाबत चौकशी केली असता त्याने सुलेमान देवळा येथील शरद हौसराव घोडके यांच्या नव्याने बांधकाम केलेल्या इमारतीमध्ये मुद्देमाल असल्याचे सांगितले. पोलिस व खत निरीक्षक त्या ठिकाणी गेले असता विविध कंपन्यांचा युरिया, रिकाम्या बॅगा, शिलाई मशीन मुद्देमाल आढळला. शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेला युरिया खताचा काळाबाजार करून औद्योगिक वापरासाठी विक्री करत असल्याप्रकरणी आबासाहेब चांगदेव शेळके (रा. घाटापिंप्री, ता. आष्टी) याच्याविरुद्ध अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.