अरुण बारसकर
सोलापूरः अवघ्या २३ साखर कारखान्यांचे सर्वाधिक गाळप व उताऱ्यात कोल्हापूर जिल्हा यंदा आघाडीवर आला आहे. ३० कारखाने सुरू असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे गाळप अन् साखर उताराही कोल्हापूरपेक्षा कमी आहे.
राज्यात १९५ साखर कारखान्यांचे ४६२ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. ऊस क्षेत्र कमी असल्याने जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांचा पट्टा जानेवारी महिन्यात पडेल असे सांगण्यात येते. जिल्ह्यात मागील वर्षाचा फटका बसला आहे.
मागील वर्षीची अवर्षण परिस्थितीचा फटका सोलापूर जिल्ह्याला बसला. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र तर फारच कमी झाले आहे. सुरू झालेला सांगोला साखर कारखाना बंद झाला आहे. इतर कारणांसह ऊस टंचाई हे कारणही कारखाना बंद होण्यासाठीचे आहे.
अनेक साखर कारखाने एक अथवा दोन पाळीत चालत आहेत. तीन पाळीत कारखाना चालेल इतका ऊस उपलब्ध नसल्याची जवळपास सर्वच कारखान्यांची स्थिती आहे. त्यामुळेच यंदा ऊस गाळपात कोल्हापूर जिल्हा पुढे गेला आहे.
मागील काही वर्षे ऊस गाळपात सोलापूर जिल्हा प्रथम तर कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर असायचा. यंदा मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांचे गाळप ६७ लाख मेट्रिक टन झाले आहे.
२९ साखर कारखाने सुरू
- यावर्षी जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता.
- त्यापैकी धाराशिव शुगर (जुना सांगोला) २६ हजार मेट्रिक टन गाळप करून बंद करण्यात आला आहे.
- उर्वरित २९ साखर कारखाने सुरू आहेत. मागील वर्षी ३३ साखर कारखान्यांनी हंगाम घेतला होता.
- यंदा ऊस तोडणी यंत्रणा तोकडी असल्याचा फटका बसला आहे.
ऊस गाळप लाख, मेट्रिक टन तर साखर उतारा क्विंटलमध्ये
जिल्हा | गाळप | साखर | उतारा |
कोल्हापूर | ६६.६९ | ७०.७७ | १०.६१ |
सोलापूर | ६४.३५ | ५१.४४ | ७.९९ |
पुणे | ५९.९८ | ५२.३ | ८.७२ |
अहिल्यानगर | ५३.६२ | ४३.९९ | ८.१९ |
सातारा | ५३.२५ | ४८.१४ | ९.०४ |
सांगली | ४३.०९ | ४३.०८ | १०.०० |
यंदा गाळप हंगाम चांगला चालेल असे वाटत होते. मात्र उसाचे क्षेत्र अत्यल्प आहे. तोडणी यंत्रणा कमी असली तरी आहे त्या यंत्रणेसाठी ऊस पुरेसा नाही. त्यामुळे ऊस गाळप लवकरच संपेल असे दिसत आहे. - महेश देशमुख, चेअरमन, लोकमंगल साखर कारखाना
अधिक वाचा: Agriculture Drone : शेती क्षेत्रात ड्रोनचा वापर कुठे आणि कसा केला जातो? पाहूया सविस्तर